जळगाव : साखरेच्या व्यापा-याची वसुली करुन घरी परत जाणा-या कारचालकाच्या ताब्यातील कार व कारमधील 7 लाख 90 हजार रुपयांची रोकड लुटीची घटना रविवारी मध्यरात्री सव्वा वाजेच्या सुमारास वावडदा ते म्हसावद दरम्यान घडली होती. या घटनेप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारसह रोकड अशी एकुण 12 लाख 50 हजार रुपयांची लुट केल्याप्रकरणी सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नाना नथु पाटील (51) हे मारुती स्विफ्ट कारचे (एमएच-02 इआर 5382) चालक एरंडोल येथील रहिवासी आहेत. एरंडोल येथील साखरेचे व्यापारी मनोज गोकुळदास मानुधने आणि कारचालक नाना पाटील एकमेकांचे परिचीत आहेत. मानुधने यांच्या सांगण्याप्रमाणे नाना पाटील हे शेंदुर्णी, सोयगाव, गोडेगाव, उडणगाव, सिल्लोड येथील व्यापा-यांकडील उधारी वसुल करण्यासाठी कारने गेले होते. विविध गावच्या व्यापा-यांकडील साखरेच्या मालाची 7 लाख 90 हजार रुपयांची वसुली केल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला लागले होते. रविवारी मध्यरात्री वावडदा आणी म्हसावद गावाच्या दरम्यान सव्वा वाजेच्य सुमारास त्यांच्या ताब्यातील कारला ओव्हरटेक करत एक कार पुढे गेली. ओव्हरटेक करणा-या कारचालकाने नाना पाटील यांच्या कारच्या पुढे त्याच्या ताब्यातील कार आडवी लावली. त्यामुळे नाना पाटील यांना नाईलाजाने कार उभी करावी लागली.
कारमधून उतरलेल्या चार इसमांपैकी दोघांनी कारचालक नाना पाटील यांना दरवाजा उघडून खाली ओढले. त्यांना खाली पाडून एक इसम त्यांच्या छातीवर व एक त्यांच्या पायावर बसला. इतर दोन इसम पुन्हा कारमधे गेले. छातीवर व पायावर बसलेल्या दोघा इसमांनी नाना पाटील यांच्या ताब्यातील कार घेवून पसार झाले. या घटनेनंतर कारचालक नाना पाटील यांना काहीही समजेनासे झाले.
त्यांनी आपल्या नातेवाईकांसह साखरेचे व्यापारी मानुधने यांच्या कानावर सर्व प्रकार घातला. कुणाकडून किती रोकड वसुल केली होती. त्याची जुळवाजुळव केल्यानंतर कारसह लुटून नेलेल्या रोकडप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 7 लाख 90 हजाराची रोकड व 4 लाख 60 हजार रुपयांची कार असा एकुण 12 लाख 50 हजार रुपयांच्या लुटीप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.