पाचोरा : पाचोरा तालुक्यातील नांद्रा शेतशिवार परिसरातील ताडमळा जंगल शिवारात बिबट्याची तिन पिले आढळून आली आहेत. संजय रामराव पाटील यांच्या शेतात मजूर दादर पिक कापणीसाठी शेतात गेले असता त्यांना ही पिल्ले आढळून आली. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती वनविभागाला कळवली. माहिती मिळताच वन विभागाचे वनक्षेत्रपाल डी.एस.देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुनील भिलावे, जगदिश ठाकरे, अमृता भोई, ललित पाटील, प्रकाश सूर्यवंशी, रामसिंग जाधव, राहुल कोळी, सचिन कुमावत यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
बिबट्याच्या तिघा पिलांना सुरक्षीत राहण्यासाठी छावणी करण्यात आली असून बिबट मादी तिघा पिलांना सुखरुप राहण्याचि व्यवस्था करण्यात आली आहे. आजुबाजूच्या परिसरात वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. तसेच कॅमेरे लावले जाणार आहेत. बिबट मादी या पिलांना सुरक्षीत स्थळी घेवून जाण्याची वाट पाहिली जाणार आहे.
दरम्यान परिसरात बिबट्याच्या दहशतीखाली शेतकरी वर्ग धास्तावला आहे. शेतातील पिकांची कापणी अद्याप बाकी आहे. अधूनमधून बिबट्या परिसरात येवून पशूधनावर हल्ला करत असतो. शेतात मजुरी करण्यासाठी जाण्यास शेतमजुर महिला व बालके जाण्यास घाबरत आहेत. गेल्यावेळी बिबट्याने गाय वासरुचा फडशा पाडला होता. आता सदर पिलांची बिबट माता आपल्या पिलांना सुरक्षीत स्थळी कधी घेवून जाते याकडे वन विभागासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. त्यासाठी वन विभागाला बारकाईने लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे. प्रसंगी रेस्क्यु ऑपरेशन देखील करावे लागेल असे म्हटले जात आहे.