घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील व्यावसायिक निलेश अग्रवाल यांच्या मालकीचे मोबाईल दुकान आहे. अग्रवाल टॉवर मधील राधे मोबाईल शॉपी या त्यांच्या मालकीच्या दुकानात19 जून रोजी चोरी झाली होती. या चोरीच्या घटनेत अज्ञात चोरटयांनी दुकानाचे शटर उचकावून अनधिकृतपणे आत प्रवेश केला होता. दुकानात विक्रीसाठी ठेवलेले लाखो रुपये किंमतीचे स्मार्टफोन चोरीस गेले होते.
या प्रकरणी घोटी पोलिसात गुन्हा रजि.नं. ७ ९/ २०२० भा.द.वि. कलम ४१७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी तपासाची धुरा सांभाळली होती. चोरटे दुकानातील सी.सी.टी.व्ही. कॅमे-यात कैद झाले होते. आरोपींच्या चेह-याला रूमाल व मास्क असल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण होते.
वरील गुन्हयातील अज्ञात आरोपीच्या वर्णनाशी साम्य असलेले संशयीत घोटी सिन्नर रस्त्यावरील ग्रामीण भागात फिरत असल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचा-यांनी सिन्नर तालुक्यातील शिवडे परिसरात सापळा रचण्यात आला.
अमोल भावराव भगत(२१) रा. महादेववाडी, शिवडे, ता.सिन्नर यास सापळा रचून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने त्याच्या साथीदारांची नावे उघड केली. त्यात योगेश काळु बिरगुडे (१९), विठ्ठल दामु ठोंबरे (२०), विश्वास प्रभाकर ठोंबरे (२०), मावंजी कॉडनी मेंगाळ (२४), सर्व रा. महादेववाडी, शिवडे, ता.सिन्नर, जिल्हा नाशिक यांची नावे उघड झाली. या साथीदारांसह त्याने गेल्या १५ दिवसांपुर्वी मध्यरात्रीच्या सुमारास घोटी शहरातील मुख्य बाजारपेठेतील एक मोबाईल शॉप फोडून महागडे स्मार्ट फोन चोरी केल्याचे कबुल केले. त्याच्या कब्जातून चोरीस गेलेले सॅमसंग, ओपो, रिअल-मी, व्हीवो, रेडमी, एम.आय., टेक्नो, इंटेल, इन्फोनेक्स अशा कंपनीचे एकूण २६ मोबाईल स्मार्ट फोन (किंमत २ लाख ६९ हजार रुपये) हस्तगत करण्यात आले.
अमोल भगत व इतर चार साथीदारांना घोटी सिन्नर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. एप्रिल महिन्यात अमोल भगत व त्याचे साथीदार विश्वास ठोंबरे व मावंजी मेंगाळ यांचेसह घोटी सिन्नर रोडवरील एस. एम.बी.टी वैद्यकिय महाविद्यालयासमोरील ओम साई मोबाईल शॉप फोडल्याची कबुली त्यांनी दिली.
याप्रकरणी वाडीव-हे पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा गु.र.न.३७/२०२० भा.द.वि. कलम ४५७,३८० उघडकीस आला आहे. यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडुन घरफोडीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील, सपोनि अनिल वाघ, स.पो.उप निरिक्षक नवनाथ गुरुळे, हे.कॉ. बंडू ठाकरे, शिवाजी जुंदरे, पो.ना. प्रितम लोखंडे, सचिन पिंगळ,निलेश कातकाडे, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबीले यांच्या पथकाने ही कारवाई केली.