औरंगाबाद : तुम्हीच अंत्यसंस्कार करुन घ्या असा अमेरिकेत स्थायिक झालेल्या एकुलत्या एक मुलीने फोनवर निरोप दिल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी कुजलेल्या अवस्थेतील मृत दाम्पत्यांवर अंत्यसंस्कार करण्याचे माणूसकीचा सन्मान करणारे काम केले आहे. काही दिवसांपूर्वी जिव देण्यासाठी नदीत उडी घेण्याच्या बेतात असलेल्या एका विवाहितेला औरंगाबाद पोलिसांनी वाचवले होते. त्या घटनेनंतर औरंगाबाद पोलिसांचे हे दुसरे चांगले काम जनतेसमोर आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील बंसीलालनगर परिसरात अजिंक्य फिलोसिया अपार्टमेंटमधील 403 क्रमांकाच्या फ्लॅट्मधे विजय माधव मेहंदळे (70) व माधुरी विजय मेहंदळे (65) हे दाम्पत्य रहात होते. या दाम्पत्याची एकुलती एक मुलगी अमेरीकेत स्थायिक झाली आहे. हे दाम्पत्य रहात असलेल्या फ्लॅटमधून 23 मार्च रोजी दुर्गंधी येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती वेदांत नगर पोलिसांना कळवली. पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे पोलिसांनी छतावर जावून किचनच्या गॅलरीतून खाली उतरुन पाहणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. या फ्लॅटमधे वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.
या प्रकरणी रितसर पंचनामा व उत्तरीय तपासणी करण्यात आली. या घटनेची माहिती अमेरीकेतील त्यांच्या मुलीला कळवण्यात आली. अमेरीकेतून येणे शक्य नसल्याचे मुलीने सांगत तुम्हीच अंत्यविधी उरकून घ्या असा निरोप पोलिसांना मिळाला. या दाम्पत्याचे नातेवाईक शहरात असले तरी त्यांचे कुणाकडे जास्त जाणे येणे नव्हते. अखेर पोलिसांनी माणूसकीला सलामी देत या वृद्ध दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्याचे काम केले. पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे, स.पो.नि. अनिल कंकाळ आणि पोलिस उपनिरीक्षक प्रमोद देवकाते आदींचा स्टाफ घटनास्थळी गेल्यानंतर हा प्रकार समोर आला होता.