नाशिक : राजेंद्र बागुल या तरुणास दारु पिण्याची भारी सवय होती. दारुचे पेग पोटात गेले म्हणजे तो जणू काही हवेत उडत असे. त्याच्या गळ्यातून पोटात उतरलेली दारु काही वेळातच वर चढत असे. ती दारु चढली म्हणजे राजेंद्र कुणाच्या ताब्यात रहात नसे. दारुच्या त्रासामुळे त्याच्या घरातील सर्वच सदस्य वैतागले होते. नाशिक जिल्ह्याच्या सुरगाना तालुक्यातील वांजुळपाडा या गावात राजेंद्र आपल्या परिवारासह रहात होता. रात्री बेरात्री कित्येकवेळा दारु पिल्यानंतर तो शेतातच झोपी जात असे. त्याच्या या सवयीची घरातील सर्व सदस्यांना कल्पना होती. त्यामुळे तो रात्री अपरात्री घरी आला नाही तरी त्याची कुणी वाट बघत नव्हते.
दि. 28 फेब्रुवारी रोजी रोटी गावात एक लग्न समारंभ होता. त्या लग्नाच्या वरातीत डिजेच्या तालावर नाचण्यासह हुल्लडबाजी करणा-या तरुणांची संख्या अधिक होती. त्या लग्नसमारंभात नाचणारे नातेवाईक कमी व कुठलाही संबंध नसलेल्या काही तरुणांची देखील संख्या होती. लग्नाची वरात म्हटली म्हणजे बघ्यांची कमी अधिक प्रमाणात गर्दी होतच असते. ज्या कुणाचा संबंध नाही ते तरुण देखील बेधुंद होऊन वरातीत नाचण्यासाठी पुढे येत असतात.
वांजुळपाडा येथील राजेंद्र बागुल हा तरुण देखील लग्नाची वरात बघण्यासाठी रोटी या गावी आला होता. राजेंद्रचा भाऊ भारत व त्याचे मित्र रात्री दहा वाजेपर्यंत वरातीचा व नाचगाण्याचा आंनद लुटत होते. दारुच्या नशेत नाचण्याची हौस भागवण्याचे काम राजेंद्र करत होता. दरम्यान वरातीमधील नाच गाण्याचा आनंद लुटून झाल्यावर राजेंद्रचा भाऊ तेथून घरी निघून गेला होता. राजेंद्रने मद्यप्राशन केले असल्यामुळे तो वरातीत डीजेच्या तालावर नाचण्याचे काम करतच होता. डीजेचा दणदणाट त्यात मद्याचा थयथयाट असा संगम जुळून आल्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत कुणाचे कुणावर धरबंधन नव्हते.
या नाचण्याच्या कार्यक्रमात राजेंद्रप्रमाणेच मधुकर उर्फ चंपा राऊळ व त्याचा मेहुणा असे दोघे जण देखील नाचण्यासाठी आले होते. नाचता-नाचता राजेंद्र व मधुकर यांना एकमेकांचा धक्का लागला. धक्का लागल्यामुळे दोघांच्या वादाला सुरुवात झाली. दोघेही मद्याच्या नशेत होते. भान विसरलेल्या राजेंद्रने मधुकर यास जाब विचारला. त्याच्या बोलण्यामुळे मधुकर यास देखील राग आला. मात्र मधुकर थंड डोक्याचा होता. त्याने त्यावेळी वाद घातला नाही. राजेंद्र यास दारुचे व्यसन असल्याचे मधुकर यास समजले होते. त्यामुळे शांत डोक्याने आपला राग शांत करण्याचे मधुकर याने मनोमन ठरवले. कारण अगदी क्षुल्लक होते. मात्र मनातील राग शांत करण्यासाठी शांत डोक्याने काम करण्याचे धोरण मधुकरचे होते.
दारु प्यायला चलतो का? असे मधुकरने राजेंद्रला हळूच विचारले. दरम्यान राजेंद्र वाद विसरला होता. मात्र मधुकर विसरला नव्हता. दारु प्यायला मिळणार असे समजल्यावर राजेंद्रची कळी खुलली होती. मात्र मधुकरच्या मनात काय कट शिजला आहे याची त्याला कल्पना आली नव्हती. नाचण्याचे काम बाजुला ठेवत वाट काढत दोघे जण बाहेर आले. मधुकरने राजेंद्रला त्याच्या दुचाकीवर डबलसीट बसवले. गाळपाडा येथे तो राजेंद्रला घेऊन गेला. त्याठिकाणी मधुकरने राजेंद्रला भरपूर दारु पाजली. दारु पिल्यानंतर राजेंद्रला पुन्हा डीजेच्या तालावर नाचण्याची मोठी घाई झाली होती. त्यामुळे तो मधुकर यास वरातीत चलण्याचा आग्रह करु लागला. मात्र मधुकरच्या मनात त्याला धक्का लागण्याच्या क्षुल्लक कारणावरुन काटा काढण्याचे विचार सुरु होते. गाळपाडा येथून परत येतांना वाटेत हरणटेकडी शिवारात रोटी फाटा येथे आल्यानंतर मधुकरने मोटरसायकल थांबवली.
रात्रीचा अंधार व काळोखाची संधी साधत मधुकरने राजेंद्रवर हल्ला केला. त्याला दगडाने ठेचून ठार केले आणि चारीत फेकून दिले. तसे बघता राजेंद्र आणि मधुकर यांच्यात पुर्ववैमनस्य नव्हते. तरीदेखील परक्याच्या लग्नात आमंत्रण नसतांना नाचतांना केवळ धक्का लागला या कारणावरुन मधुकरने राजेंद्रचा खून केला. आपल्यावर कुणाचाही संशय येणार नाही असे मनाशी म्हणत तो निर्धास्तपणे तेथून निघून गेला.
वरातीत नाचण्यासाठी गेलेला राजेंद्र त्या दिवशी घरी परत आलाच नाही. राजेंद्र परस्पर शेतात झोपायला गेला असेल असे समजून त्याची रात्री कुणी वाट पाहिली नव्हती. मात्र सकाळ झाली तरी राजेंद्र घरी परत आला नाही. त्यामुळे राजेंद्रचा भाऊ भारत त्याला बघण्यासाठी शेतात गेला. मात्र शेतात देखील राजेंद्र नव्हता. दारुच्या नशेत तो रस्त्यात कुठे पडला तर नसेल या विचाराने त्याचा भाऊ भारत त्याचा शोध घेऊ लागला.
दरम्यान भारतला त्याचा मित्र श्याम याने मोबाईलवर एक तातडीचा निरोप दिला. पलीकडून बोलणा-या श्यामने भारतला म्हटले की तु तात्काळ रोटी फाट्यावर निघून ये. रोटी फाट्यावर पोलिस आले असून लोकांची गर्दी देखील आहे. याठिकाणी तुझ्या भावाचा मृतदेह पडलेला आहे. घटनास्थळावर भारत येताच त्याला पोलिसांनी मृतदेह दाखवला. मृतदेह बघताच भारतच्या पायाखालची वाळू सरकली. तो धाय मोकलून रडू लागला. हा माझा भाऊ राजेंद्र असल्याचे त्याने रडत रडत पोलिसांना सांगितले. मयत राजेंद्रच्या डोक्यात दगड घातल्याने त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. अतिशय कृर पद्धतीने हा खून करण्यात आला होता. मयताची ओळख पटल्यामुळे पोलिस पथकाने पुढील कारवाईकामी पंचनामा आणि शवविच्छेदनकामी मृतदेह रुग्णालयात रवाना करण्याची तयारी केली.
मयत राजेंद्रचे कुणाशी वैर होते का? त्याचा खून कुणी व कशासाठी केला असेल? या प्रश्नांची उकल करण्याकामी सुरगाना पोलिस स्टेशनचे पो.नि. दिवाणसिंग बसावे विचारमग्न झाले. याप्रकरणी सुरगाणा पोलिस स्टेशनला अज्ञात मारेक-याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न.13/21 भा.द.वि. 302 नुसार दाखल करण्यात आला.
सुरगाणा पोलिस स्टेशनचे पो.नि. दिवाणसिंग बसावे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. वाघ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुंडे, महाले, निलेड बोडखे, सागर नांद्रे आदींनी या तपासकामी सुरुवात केली. घटनेच्या रात्री मयत राजेंद्र वरातीत नाचत असल्याची माहिती पोलिस पथकाला समजली होती. या वरातीत सुरु असलेल्या नाचगाण्याच्या वेळी मोबाईलमधे करण्यात आलेली शुटींग व फोटोसेशन पोलिस पथकाने हस्तगत केले. त्या व्हिडीओमधे मयत दिसून आला. नाचतांना मयत राजेंद्र सोबत सुरगाणा तालुक्यातील राजभुवन येथील मधुकर राऊळ हा तरुण आढळून आला. मयत राजेंद्र व मधुकर राऊळ असे दोघेजण वाद घालतांना व गर्दीतून वाट काढत निघून गेल्याचे व्हिडीओत पोलिसांना दिसून आले. त्यामुळे मधुकर राऊळ याच्यावर पोलिस पथकाचा संशय बळावला. मधुकर गावातून बेपत्ता असल्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय अजून बळकट झाला.
पोलिस पथकाने त्याचा कसून शोध घेतला असता तो सटाणा तालुक्यातील तळवाडे दिगर येथे असल्याची माहिती पुढे आली. त्याला शिताफीने चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. रोटी या गावी वरातीत डीजेच्या तालावर नाचत असतांना राजेंद्रचा धक्का मधुकर यास लागला होता. या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून मधुकर राऊळ याने राजेंद्रचा दगडाने ठेचून खून केला होता. खून करण्यापुर्वी मधुकर याने राजेंद्रला मोठ्या प्रमाणात दारु पाजली होती. अशा प्रकारे अवघ्या दोन दिवसात या खूनाचा उलगडा करण्यात आला. एलसीबीसह सुरगाणा पोलिसांनी संयुक्तपणे हा तपास पुर्ण केला.