चैनीसाठी टोळीने लुटमार करायचे गुन्हेगार – चौघा निष्पापांना केले त्यांनी कायमचे गार

नाशिक : सचिन उर्फ बोंग्या सखाहरी चव्हाण, सचिन विरुपण भोसले आणि संकेत महेंद्र चव्हाण हे तिघे गुन्हेगारी वृत्तीचे तरुण होते. तिघे मित्र एकत्र जमले म्हणजे लुटमारीचा प्लान करत असत. तिघांच्या अंगी कामधंदा करण्याची तयारी नव्हती. मुळातच गुन्हेगारी वृत्तीचे तिघे मित्र चो-या आणि लुटमारीशिवाय दुसरा उद्योग करत नव्हते. लुटमारीच्या रकमेतून चैनीचे जिवन जगण्याची तिघांना सवय जडली होती. लुटमारीच्या गुन्ह्यातून चांगली रग्गड कमाई झाल्यामुळे व गुन्हा पचल्याची खात्री झाल्यानंतर तिघांची भिड चेपली.  तिघांच्या अंगी गुन्हेगारी वृत्ती चांगलीच फोफावली होती.

तिघा सराईत गुन्हेगारांवर नाशिक जिल्हयातील नांदगाव, येवला तालुका, औरंगाबाद जिल्हयातील वैजापुर, गंगापुर, आणि अहमदनगर जिल्हयातील कोपरगाव, नगर तालुका पोलीस स्टेशनमधे दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरी असे मालाविरुध्द आणि शरिराविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. रात्रीच्या वेळी बंद घर किंवा वाडी-वस्तीवरील  एकांतातील घरावर पाळत ठेऊन तेथे चोरी व लुटमार करण्याची त्यांची सवय होती. या दरम्यान कुणी जागे झाल्यास त्यांना मारहाण व प्रसंगी जिवे ठार करण्यास देखील तिघेजण मागेपुढे बघत नव्हते.

गेल्यावर्षी 6 ते 7 ऑगस्ट 2020 च्या मध्यरात्री नांदगाव परिसरातील वाखारी ते जेउर रस्त्यालगत वाखारी शिवारात असलेल्या शेतातील घराच्या ओटयावर समाधान चव्हाण हा त्याची पत्नी भारती, मुलगी कु.आराध्या (7) व मुलगा अनिरुध्द (5) असे चौघे जण झोपलेले होते. झोपलेल्या चौघांचा त्या रात्री खून झाला होता. हल्लेखोरांनी धारदार हत्याराने त्यांच्या मानेवर, डोक्यावर, हातावर वार करून त्यांची हत्या केली होती. या घटनेप्रकरणी मालेगाव तालुका पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा गु.र.न.  268/2020 भा.द.वि. 302 नुसार दाखल करण्यात आला होता.

नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी या गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजेंद्र कुटे व त्यांच्या सहका-यांवर सोपवली होती. पो.नि.राजेंद्र कुटे यांनी या तपासकामात स्वत:ला झोकून देत तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली. खब-यांशी संपर्क साधत तपासाच्या पारंपारिक व तांत्रिक पध्दतीचा अवलंब करण्यात येत होता. या घटनेतील मयत व्यक्तींचे कुणाशी भांडण, आर्थिक देणे-घेणे होते का याचा देखील तपास करण्यात येत होता. दरम्यान अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव येथील अभिलेख्यावरील आरोपींचा ठावठिकाणा देखील घेण्यात आला.

दरम्यान खब-यांकडून तपास पथकाला समजले की सचिन उर्फ बोंग्या उर्फ पवन उर्फ रवि उर्फ धर्मा सखाहरी चव्हाण (पढेगाव, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर), सचिन विरुपण भोसले (शिरोडी, ता.वाळूज, जि.औरंगाबाद) व संकेत उर्फ संदिप महेंद्र चव्हाण (भुषणनगर, दत्तचौक, केडगाव जि.अहमदनगर ह.मु. पढेगाव, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर) हे तिघे सराईत गुन्हेगार घटनेच्या कालावधीत संशयीतरित्या वागत होते.

या माहितीच्या आधारे संशयीत व्यक्तींची तज्ञ मानसशास्त्रांज्ञांकडून पडताळणी करण्यात आली. सचिन उर्फ बोंग्या सखाहरी चहाण हा या हत्याकांडाच्या कालावधीत वाखारी परिसरात होता अशी माहिती पो.नि. राजेंद्र कुटे व त्यांच्या सहका-यांना समजली. हे हत्याकांड या तिघा सराईत गुन्हेगारांनीच केले असल्याची खात्रीलायक माहिती तपासात समोर आली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु होता.

यातील आरोपी संकेत महेंद्र चव्हाण हा दहावा मैल परिसरात नाशिक येथून कोपरगावला जाणार असल्याची माहिती पोलिस पथकाला समजली. त्यानुसार त्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला. या सापळ्यात तो अलगद अडकला. त्यानंतर क्रमाक्रमाने त्याचे इतर दोघे साथीदार देखील पोलिस पथकाच्या हाती लागले. त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. काही कामधंदा करण्याची सवय नसल्याने व चैनीसाठी पैशांची आवश्यकता असल्याने रात्रीच्या वेळी बंद घर अथवा वाडी-वस्तीवरील एकांतात असलेले घर शोधून ते चो-या करत होते. चो-या करतांना कुणी जागे झाले तर त्यांना तिघे जण मारहाण करत होते. या घटनेत एकाच कुटूंबातील चौघांची हत्या करण्यात आली होती.

नाशिक ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक संजयकुमार सोने, सहायक फौजदार रविंद्र शिलावट, हवालदार रविंद्र वानखेडे, नंदु काळे, संजय गोसावी, पोलिस नाईक विश्वनाथ काकड, सागर काकड, प्रविण सानप, सतिष जगताप, हरिष आहाड, पो.कॉ. कुणाल मोरे, गिरीष बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, गौरव पगारे आदींनी या तपासकामात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here