जळगाव : जळगाव येथील विविध दालमिल व्यापा-यांची फसवणूक करणा-या चौघा भामट्यापैकी एकास अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे.
एमआयडीसी परिसरातील दालमिल व्यापारी सिद्धार्थ नवरतन जैन, सत्यनारायण रामप्रसाद बाल्दी, दिनेश रामविलास राठी, पुष्पक अरविंद मनियार, अविनाश किशोर कक्कड, किशोरचंद चंचलचंद भंडारी या सहा दाळ व्यापा-यांकडून प्रमुख एंटरप्रायजेस व प्रमुख ट्रेडींग कंपनी सुरत यांनी अनुक्रमे प्रविणभाई व मुकेशभाई अशी नावे सांगून जीएसटी क्रमांक व बॅंक स्टेटमेंट दाखवत विश्वास संपादन करुन विविध प्रकारच्या डाळी मागवल्या होत्या.
यातील रमेशचंद तेजराज जाजू यांच्याकडून 16 लाख 89 हजार 950, सिद्धार्थ नवरतन जैन यांच्याकडून 2 लाख 63 हजार 970, सत्यनारायण रामप्रसाद बाल्दी यांच्याकडून 2 लाख 37 हजार, दिनेश रामविलास राठी यांच्याकडून 9 लाख 36 हजार 90, पुष्पक अरविंद मणीयार यांच्याकडून 1 लाख 31 हजार 15, अविनाश कक्कड यांच्याकडून 2 लाख 70 हजार व किशोरचंद्र भंडारी यांच्याकडून 10 लाख 38 हजार 863 रुपयांचा असा एकुण 45 लाख 66 हजार 888 रुपयांचा विविध दाळीचा माल मागवण्यात आला होता. माल मिळाल्यानंतर मालाचे पैसे न देता फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा रमेशचंद्र तेजराज जाजू रा. गणपती नगर जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.न. 100/21 भा.द.वि.406, 409, 420, 34 अन्वये दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसंच्या गुन्हे शोध पथकाने निलेश वल्लभभाई सुदाणी सुरत यास अटक केली आहे. यापैकी केतन मिताभाई कपुरिया, अरविंद क्याडा सुरत, मुकेश देवशीभाई कथोरोटीया , मुकेश देवशीभाई कथोरोटीया सुरत यांचा शोध सुरु आहे.
इतर व्यापाऱ्यांची देखील फसवणूक झाल्याने या गुन्ह्यातील अपहाराचा आकडा वाढला. आरोपीतांनी आपले खोटे नाव व पत्ते सांगून जळगावच्या सहा व्यापाऱ्यांशी व्यवहार करत फसवणूक केल्याचे या घटनेतून उघड झाले. आरोपी वापरत असलेले मोबाईल व त्यांची सुरत येथील दुकाने त्यांनी बंद करुन ते पसार झाले असल्याचे तपासात उघड झाले. गुन्हे शोध पथकाने तपासकामी तिने वेळा सुरतवारी केल्यानंतर एक आरोपी गळाला लागला. आरोपींनी ज्या मालवाहू वाहनातून दाळीचा माल वाहून नेला होता त्या चालकाचा शोध घेण्यात आला. त्यानंतर आरोपींची हळूहळू खात्री पटवण्यात आली.
अटकेतील निलेश सुदाणी याला अटक करण्यात पोलिस पथकाला यश आले. दुस-या आरोपीचा राजकोट येथे कसून शोध घेण्यात आला. मात्र पोलिस आपल्या मागावर असल्याचे लक्षात आल्यानंतर तो फरार होण्यात यशस्वी झाला. इतर आरोपींचा देखील कसून शोध घेतला जात आहे. अतिशय थंड डोक्याने व कुशलतेने व्यापारी बुद्धीने व्यापा-यांना फसवणूक करणारी ही टोळी असून व्यापारात कुणावर विश्वास ठेवू नये हे या घटनेतून दिसून आले आहे. “विश्वास गेला पाणीपतच्या युद्धात” या म्हणीप्रमाणे विश्वासघात होण्याचा प्रकार या घटनेत दिसून आला आहे.
अटकेतील आरोपी निलेश सुदाणी यास न्या. प्रीती श्रीराम यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला 13 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी सरकारतर्फे अॅड.शिरसागर यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याच्या तपासकामी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, चेतन सोनवणे, आसीम तडवी यांनी सहभाग घेतला.