औरंगाबाद : सलून चालकाच्या मृत्यूस पोलिस कारणीभूत असल्याचा आरोप करत औरंगाबाद जिल्ह्यातील उस्मानपुरा पोलिस स्टेशनवर मयताच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 14 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात खळबळ माजली होती. मयत सलून चालकाच्या नातेवाईकांनी पोलिस प्रशासनाविरुद्ध भुमिका घेत मृतदेह थेट उस्मानपुरा पोलिस स्टेशनला आणला होता. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुकानावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत वाद सुरु असतांना सलून चालक बेशुद्ध पडला. त्यामुळे तो खाली कोसळून त्याच्या डोक्याला मार लागल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधे दिसून आले आहे. डोक्याला मार लागून गंभीर दुखापत हे मृत्यूचे कारण वैद्यकीय अहवालात नमुद करण्यात आले आहे. पोलिसांच्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा दावा करत ठिय्या आंदोलन करणा-या नातेवाईकांनी काल बराच गोंधळ घातला होता. त्यामुळे मोठी कुमक मागवावी लागली होती.