बारामती : बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे तरूणींचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देणा-यास बारामती ग्रामिण पोलिसांनी जेरबंद केले आहे. हा आरोपी फेसबुकच्या माध्यमातून तरूणींचे मोबाईल क्रमांक शोधून काढत होता. त्यानंतर त्याच्याशी बोलण्यासाठी गळ घालत असे. एखाद्या तरुणीने त्याच्यासोबत बोलण्यास नकार दिला तर तो तिचे बनावट अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत असे. या गुन्हयातील आरोपीवर राज्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.
संदीप सुखदेव हजारे (२९) रा. आंबवडे, ता. खटाव, जि. सातारा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याला दहिवडी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर समर्थ पोलीस ठाणे पुणे, घारगाव पोलीस ठाणे अहमदनगर, कराड पोलीस ठाणे, संगमनेर पोलीस ठाणे, या पोलीस स्टेशनला मुलींना अश्लिल फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्याबाबत गुन्हे दाखल आहेत.
आरोपीने बारामती तालुक्यातील एका तरुणीला तिचे बनावट अश्लिल फोटो पाठवले. त्याने ते फोटो व्हायरल करण्याची तिला धमकी दिली होती. तरुणीने बारामती तालुका पोलीस स्टेशनला या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार काल रात्री गुन्हे शोध पथकाने छडा लावत आरोपीस दहिवडी ( ता. खटाव, जि.सातारा) येथून ताब्यात घेत अटक केली आहे.