जळगाव : रावेर तालुक्यातील लोहारा या गावी अस्वच्छतेच्या अनेक समस्या असून ग्रामपंचायतीने या समस्या मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. अस्वच्छतेच्या समस्यांना वैतागल्यामुळे ग्रामस्थांमधे तिव्र स्वरुपाचा संताप व्यक्त केला जात आहे.
रावेर तालुक्यातील लोहारा हे गाव सातपुडा पायथ्याशी वसलेले आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून या गावातील सर्व गटारी तुंबलेल्या आहेत. त्यामुळे दुषीत पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या असून रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा तयार झाला आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी याप्रकरणी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या असल्या तरी देखील समस्यांचे निवारण झालेले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत या समस्यांकडे डोळेझाक का करत आहे हे ग्रामस्थांसाठी न उलगडणारे कोडे म्हणावे लागत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरु असून गटारीचा प्रश्न सोडवला जात नसल्यामुळे डासांची उत्पत्ती देखील वाढली आहे. त्यामुळे मलेरीयासारखे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोहारा गावाच्या बाहेर असलेले सार्वजनिक शौचालय स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात आले आहे. त्याठिकाणी पाण्याची सोय अजुनपर्यंत करण्यात आलेली नाही. त्याठिकाणी पाण्याचे हौद बांधावे यासाठी ग्रामस्थ मागणी करत आहेत. महिलांच्या शौचालयाचा प्रश्न देखील अद्याप सोडवला गेला नसल्याचे दिसून येत आहे. गावात योग्य ठिकाणी मुता-यांची सोय करणे आवश्यक आहे. मात्र त्यादेखील बांधण्यात आलेल्या नाहीत. अशा एक ना अनेक समस्या लोहारा गावी असून वैतागलेले लोहारावासीय ग्रामपंचायतीवर एखाद्या दिवशी मोर्चा नेण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूका आल्या म्हणजे उमेदवार ग्रामस्थांकडे हात जोडून मते मागण्यासाठी येतात. मात्र निवडणूक झाली म्हणजे ग्रामस्थांच्या समस्या वा-यावर सोडून दिल्या जातात असे लोक आता खुलेआम बोलू लागले आहेत.