जळगाव : कोविड रुग्णांवर उपचाराची मान्यता नसतांना भडगाव येथील श्वास हॉस्पीटल मधे जवळपास 12 ते 13 कोविड रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे 2 एप्रिल रोजी तहसीलदारांच्या पाहणीत आढळून आले होते. तहसीलदारांच्या पाहणी दरम्यान डॉ. तुषार सुर्यवंशी यांच्या मालकीच्या “श्वास हॉस्पीटल” मधे उपचार घेणा-या रुग्णांचे एचआरसीटी स्कोअर 12 ते 13 च्या दरम्यान होते. यातील 79 वर्ष वय असलेल्या एका कोविड पॉझीटीव्ह महिलेवर उपचार सुरु असल्याचे पाहणीत आढळून आले होते. मात्र डॉ. तुषार सुर्यवंशी यांच्या दवाखान्याला कोवीड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी नसतांना डॉ. तुषार सुर्यवंशी कोविडवरील उपचार करत असल्याचे आढळून आले होते. ते रुग्णांना रेमडेसिवीर औषध बाहेरुन घेऊन येण्यास सांगत असल्याचे देखील आढळून आले होते. त्यांच्याकडे कुठलेही रजिस्टर आढळून आले नव्हते. याशिवाय या दवाखान्यात व्हेंटीलेशनची सुविधा नव्हती. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला असतांना मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आली होती. श्वास हॉस्पीटलसाठी कोविड सेंटरचा अधिकृत परवाना नसतांना देखील या दवाखान्यात कोविड रुग्णावर उपचार सुरु असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी भडगाव यांनी जिल्हाधिकारी जळगाव (गृह शाखा) यांना 2 एप्रिल 2021 रोजी पत्राद्वारे केली आहे.
भडगाव येथील मुख्य रस्त्यावर डॉ. तुषार सुर्यवंशी यांच्या दवाखान्यात रुग्णांना आकर्षित करण्याचा प्रकार सुरु असल्याचे दिसून येत आहे. कोविड उपचारासाठी येणा-या रुग्णांवर थातुरमातूर उपचार करुन लाखो रुपयांची रुग्णांकडून लुट केली जात असल्याचे म्हटले जात आहे. काही डॉक्टर व मेडीकल चालक यांची याकामी मिलीभगत असल्याचे देखील म्हटले जात आहे. याप्रकरणी जिल्हा शल्य चिकीत्सक व जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून चौकशीची कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.