सुड घेण्यासाठी एकवटले मित्र,साधला नेम! जेलमधून आलेल्या संतोषचा केला त्यांनी गेम !!

इस्लामपूर : आजकालच्या हिंदी सिनेमात हिंसाचार आणि भाईगिरी दाखवली जाते. सिनेमाच्या माध्यमातून दाखवल्या जाणा-या भाईगिरीचा प्रभाव आजच्या तरुण पिढीवर पडला आहे. कॉलर टाईट करुन सिनेमातील हिरो अथवा व्हिलन प्रमाणे दुस-यावर हुकुमत गाजवण्याची लालसा कित्येक तरुणांच्या मनात निर्माण होते.

अनेक तरुणांची पावले गुन्हेगारी व भाईगिरीकडे वळत असल्याचे दुर्दैवी चित्र आजकाल दिसून येते. वर्चस्व आणि अस्तित्वाची लढाई या टोळ्या निर्माण होण्यास कारणीभुत असते. या टोळ्यांमधून कधी कधी गॅंगवार देखील होत असते. टोळीतील सहका-याचा कुणी जिव घेतला म्हणजे ती टोळी प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्याचा अथवा म्होरक्याचा खून करण्यास मागेपुढे बघत नाही.

इस्लामपूर शहरात अशाच दोन टोळ्यांमधील दुश्मनी उफाळून आली होती. त्यातून एका नामचीन गुंडाचा खात्मा करण्यात आला. पोलिसांनी हल्लेखोर आरोपींना अटक केली.

इस्लामपूर भागातील निनाई नगरात संतोष कदम हा आपल्या कुटुंबासह रहात होता. संतोष गुन्हेगारी वृत्तीचा असल्यामुळे साहजिकच त्याचे मित्र देखील तसेच होते. मिळाले तर काम करायचे नाहीतर मित्रांसोबत मौजमस्ती करणे हा त्यांचा उद्योग होता.

गुन्हेगारी वृत्ती अंगी असल्यामुळे साहजिकच त्यांच्या मुखातून मधूर वाणीचा उगम होत नसे. सर्व मित्रांची त्यांच्या मुखातून निकृष्ट दर्जाची शब्दरचना आकार घेत असे. संतोष व त्याचे मित्र समोर आल्यावर एकमेकाला मित्र म्हणवत असले त्यांच्यात कमी अधिक प्रमाणात अंतर्गत दुश्मनी होती.  

अजित पाटील, सुरज जाधव आणि प्रतिक पाटील या तिघा मित्रांचा एक गट होता. तिघे एकवटलेले मित्र संतोषवर चिडलेले होते. तिघांना संतोषचा कायमचा काटा काढायचा होता. त्यांना “खून का बदला खून” या म्हणीप्रमाणे संतोषचा वचपा काढायचा होता. मात्र त्यांना संधी मिळत नव्हती.

संतोष नेहमी शस्त्रानिशी सज्ज राहतो हे त्यांना माहिती होते. सन २०१३ मधे खून आणि सन २०१८ मधे खूनाचा प्रयत्न करणे असे दोन वेगवेगळे गुन्हे संतोषवर दाखल होते. अजित पाटील, प्रतिक पाटील, सुरज जाधव याच्यावर ही इस्लामपूर पोलीस स्टेशनला विविध गुन्हे दाखल होते. त्यांच्यावर खूनाचा प्रयत्न करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, जाळपोळ करणे असे गुन्हे होते.

या तिघांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. सन २०१३ साली निनाई नगरातील अण्णा लोहार याच्या खून प्रकरणी संतोष कदमवर गुन्हा दाखल होता. या गुन्हयात तो मुख्य आरोपी होता. गेल्या वर्षापुर्वी त्याची या गुन्हायातून सबळ पुराव्याअभावी सुटका झाली होती. अण्णा लोहार हा अजित पाटील आणि प्रतिक पाटील याच्या गॅगसोबत जुळलेला होता. त्याच्या खूनाचा बदला तिघांना संतोषचा खून करून घ्यायचा होता.

किरकोळ कारणातून संतोषने अण्णा लोहारचा खून केला होता. संतोषने आपल्या मित्राला नाहक जिवानिशी मारल्याची भावना तिघांची झाली होती. त्यामुळे तिघे मित्र संतोषवर नजर ठेवून होते. तिघे संतोषच्या खूनासाठी संधीच्या शोधात होते. तिघे जण संतोष सोबत रहात असले तरी ते त्याच्या खूनाच्या प्रयत्नात होते.

रविवार दि .२८ जून रोजी रात्रीच्या वेळी संतोषने भरपूर मद्यप्राशन केले होते. त्यामुळे तो शुद्धीवर नव्हता. त्याचवेळी औद्योगीक वसाहतीच्या एका रिकाम्या शेडमध्ये अजित पाटील, सुरज जाधव व प्रतिक पाटील हे तिघेही  मद्याची पार्टी करत होते. मद्याची पार्टी आटोपून तिघे भरधाव वेगाने परत येत होते. वाटेत अजित व सुरज यांनी मुद्दाम संतोष कदम याच्या गाडीसमोर त्यांची गाडी आडवी लावून दादागिरि करु लागले.

त्यावेळी संतोषवर मद्याचा अंमल चढलेला होता. दोघांनी संतोषसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. सर्वच जण मद्याच्या आहारी गेले होते. त्यामुळे तिघे एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. रात्रीच्या वेळी गस्तीवरील पोलिसाने त्यांना हटकेल. त्यामुळे तिघेही तेथून निघुन गेले. या संधीचे सोने करण्याचे अजित व सुरज यांनी मनाशी ठरवले.

संतोष यास संपवण्याची ही नामी संधी असल्याचे त्यांनी ओळखले. त्यांनी प्रतिक पाटील यास सोबत घेत संतोष रहात असलेल्या निनाईनगर कडे धाव घेतली. त्यावेळी रात्रीचे साडेबारा वाजले होते. तिघांनी अजून काही मित्रांना सोबत घेत संतोषचे घर गाठले. सर्वांनी शिवीगाळ करत संतोष यास घरातून बाहेर बोलावण्यास सुरुवात केली.

मद्याच्या आहारी गेलेला संतोष धाडस दाखवत मी एकटाच तुम्हाला पुरेसा आहे अशा अविर्भावात बाहेर आला. तो जवळ येताच रागाच्या भरात अजित पाटील व प्रतिक पाटीलने त्याला पकडून खाली पाडले. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. रात्रीच्या वेळी निनाई चौकात हा गोंगाट सुरु होता. त्यामुळे अनेकांची झोपमोड झाली. सर्वच जण सराईत गुन्हेगार असल्यामुळे कुणी त्यांच्या वादात सहभाग घेत नव्हते.

काही कळण्याच्या आत सुरज जाधव व अजित पाटील यांनी आपल्या खिशातील चाकू बाहेर काढला. दोघे संतोष कदम याच्या मानेवर, तोंडावर आणि छातीवर घाव घालत होते. या मारहाणीत संतोष गंभीर जखमी झाला. आपला जीव वाचवण्यासाठी शरद कदम याच्या घरात शिरला. परंतु चाकूचे घाव जोरात बसल्यामुळे तो तळमळत होता. त्याला निट पळता येत नव्हते. त्यामुळे तिघा मित्रांनी खिंडीत गाठून त्याच्यावर सलग वार सुरुच ठेवले. तो रक्तबंबाळ झाल्यानंतर सर्व हल्लेखोर पळून गेले.

काहीवेळाने संतोषच्या घरातील लोक घटनास्थळावर धावत आले. संतोष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याने काही वेळातच आपला जिव सोडला. त्याला लागलीच एका खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले.

खूनाच्या या घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आपल्या सहकारी कर्मचारी वर्गासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपअधिक्षक कृष्णकांत पिंगळे यांनी देखील घटनास्थळी भेट देत अधिकारी वर्गाला तपासकामी योग्य त्या सुचना दिल्या.

संतोष रखमाजी कदम या तरुणाच्या हत्येप्रकरणी शरद वसंत कदम यांच्या फिर्यादीनुसार इस्लामपूर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अजित हणमंत पाटील (२८)  रा.शिवाजी चौक, सुरज उर्फ पांडया जाधव (२६) रा.उदय चौक), आणि प्रतिक उर्फ पिल्या पाटील (१९) यांचेसह इतर तीन ते चार जणांवर भा.द.वि. ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

या घटनेचे नेमके कारण काय होते? मारेकरी कोण होते याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पो.नि. नारायण देशमुख यांच्या निर्देशाखाली पोलिस तपास पथक मारेक-यांच्या मागावर होते. अजित पाटील, सुरज जाधव आणि प्रतिक उर्फ पिल्या पाटील या तिघा संशयीतांना शोधून त्यांना अटक करण्यात आली.

त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस कोठडी दरम्यान तिघांनी आपला गुन्हा कबुल केला. संशयीतांनी गुन्हयात वापरलेली मोटारसायकल व चाकू हस्तगत करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पो.नि.नारायण देशमुख व त्यांचे सहकारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here