जळगाव : कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारे रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे रॅकेट जळगाव पोलिसांनी शोधून काढले असून एकुण आठ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जळगाव जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. मुंढे बोलत होते.
एका प्रकरणात 6 व दुस-या प्रकरणात 2 अशी जादा दराने विक्री झालेली एकुण 8 रेमडीसीवीर इंजेक्शन्स ताब्यात घेण्यात आली आहेत. सरकारी दराच्या तुलनेत कमाल 35 हजार रुपयांपर्यंत या रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या दराने बेकायदा विक्री सुरु होती. ती जळगाव पोलिसांनी उधळून लावली आहे. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या गुन्ह्यात 9 आरोपी निष्पन्न करण्यात आली असून त्यातील एकुण 8 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. अटकेतील आरोपींकडून 6 इंजेक्शन्स हस्तगत करण्यात आली आहेत. दुस-या गुन्ह्यात 2 इंजेक्शन्स हस्तगत करण्यात आली आहेत.
जळगाव येथील ज्युपीटर हॉस्पीटलचा वार्ड बॉय शुभम शार्दुल याच्यापासून तपासाची लिंक लागण्यास सुरुवात झाली. शुभम शार्दुल याने मयुर विसावे या वैद्यकीय प्रतिनिधीकडून इंजेक्शन्स घेतले होते. मयुर विसावे याने ते इंजेक्शन्स आकाश जैन (नवकार फार्मा मेडीकल) याच्याकडून घेतले होते. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
दुस-या प्रकरणात दहा जणांची लिंक आढळून आली. त्यापैकी नऊ जण अटक करण्यात आले आहेत. या प्रकरणातील शेख समीर शेख सगीर याच्यापासून तपासाची लिंक लागली. शेख समीर हा ऑर्कीड हॉस्पीटल येथे लॅब असिस्टंट म्हणून कामाला होता. रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या टोळीची लिंक तपासली असता त्यात दहा आरोपी निष्पन्न झाले. त्यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली. या टोळीतील डॉ. तौफिक शेख हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. पोलिस त्याच्या मागावर आहे. डॉ. तौफिक शेख हा तांबापुरा येथील दवाखान्यात काम करत होता.वाढीव दराने कुणी रेमडेसिवीर इंजेक्शन्स विकत असतील वा कुणाला याबाबत माहिती असल्यास जळगाव पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी केले आहे. जनतेला थेट पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याशी 7219091773 या क्रमांकावर देखील संपर्क साधता येणार आहे.