औरंगाबाद: आरोपीविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल केल्यामुळे बक्षीस म्हणून तक्रारदार महिलेकडुन पाच हजार रुपयांची लाच घेताना उस्मानपुरा पोलिस स्टेशनमधील हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले .
शिवाजी दामू गाडे असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे . तक्रारदार महिलेने तिच्या पतीविरोधात ट्रिपल तलाक दिल्याची फिर्याद उस्मानपुरा पोलिस स्टेशनला दाखल केली होती. या गुन्हयाचा तपास पोलिस हवालदार गाडे यांनी पुर्ण केला.
काही दिवसांपूर्वी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या कामाचे बक्षीस म्हणून गाडे यांनी तक्रारदार महिलेकडे पाच हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार महिलेची लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गाडे यांच्याविरुध्द तक्रार दाखल केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षक रेश्मा सौदागर यांनी आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाच्या मदतीने आज सापळा रचला. उस्मानपुरा पोलिस स्टेशनला हवालदार गाडे यांनी पंचासमक्ष लाचेची मागणी केली व तक्रारदाराकडून पाच हजार रुपये घेतले.
यावेळी दबा धरून बसलेल्या पथकाने गाडे यांना लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सापळा यशस्वी करण्यासाठी पोलीस नाईक विजय ब्राम्हंदे , रवींद्र अंबेकर, अनिल जाधव यांनी सहभाग घेतला.