भरधाव टॅंकरच्या धडकेत एक ठार दोघे जखमी

जळगाव : आज भल्या पहाटे जळगाव शहरातून जाणा-या महामार्गावरील अजिंठा चौफुलीवर भरधाव वेगातील टॅकरने उभ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या धडकेत कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच एक कंटेनर चालक मयत झाला असून दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की शिव गजानन लॉजीस्टीक, मुंबई या ट्रान्स्पोर्ट कंपनीचे तिघे कंटेनर चालक आपापल्या ताब्यातील केमीकलने भरलेल्या कंटेनरसह सोबत निघाले होते. यातील रमेश आव्हाड या कंटेनर चालकास जळगाव एमआयडीसी परिसरातील बेंझो केमीकल येथे जायचे होते. इतर दोघा कंटेनर चालकांना मलकापुर येथे जायचे होते. तिघे कंटेनर चालक नेहमीप्रमाणे हॉटेल मानसनजीक नविन ट्रान्सपोर्ट या ठिकाणी रस्त्याच्या बाजुला वाहने लावुन खाली आले. त्याठिकाणी त्यांनी आपल्या ताब्यातील वाहनांचे इंधन, हवा तपासून पाहण्यास सुरुवात केली.

यावेळी धुळे येथून भुसावळच्या दिशेने भरधाव वेगाने जाणा-या टॅंकरने (एमएच 43 बीपी 5569) उभ्या असलेल्या कंटेनरला (एमएच 46 एच 6497) जोरदार धडक दिली. या धडकेत कंटेनर जवळ उभे असलेले चालक दिलीप पाखरे व नामदेव महाजन हे दोघे टॅकरच्या चाकाखाली आले व रमेश आव्हाड हा रस्त्याच्या कडेला फेकला गेला. कंटेनरला धडक देणारा टॅंकर चालक (एमएच 43 बीपी 5569) न थांबता टॅंकरसह फरार होण्यात यशस्वी झाला.

या अपघातात दिलीप पाखरे, रमेश आव्हाड व नामदेव महाजन या तिघांना गोदावरी हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दिलीप पाखरे हा चालक गंभीर जखमी असल्यामुळे मयत झाला. इतर दोघांपैकी नामदेव महाजन हा चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. चालक रमेश आव्हाड याने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला फरार अज्ञात टॅंकरचालकाविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आल आहे. मयत दिलीप पाखरे या चालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीकामी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here