मुंबई : अनिल देशमुख यांच्याविरुद्ध आता ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडून राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या शंभर कोटीच्या खंडणी वसुली प्रकरणाला नवा टर्न मिळाला आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आता रा.कॉ. पक्षात खळबळ माजली आहे.
अनिल देशमुख यांची सुरुवातीला सीबीआयने प्राथमिक चौकशी केली होती. त्यानंतर दिल्लीत भ्रष्टाचाराचे आरोप लावत गुन्हा दाखल करण्यात आला. आता याप्रकरणी ईडीने प्रवेश केला असुन देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता बळावली असून ईडीचे शुक्लकाष्ठ लागणार असल्याचे म्हटले जात आहे. दिल्लीत सीबीआयने दाखल केलेल्या प्रथम खबरी अहवालात सचिन वाझे यांच्या नियुक्तीमधे संशयीत आरोपी म्हणून अनिल देशमुख यांच्या नावाची नोंद झाली असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहे. याशिवाय पदाचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका देखील त्यांच्या नावे ठेवण्यात आला आहे. सदर गुन्हा रद्द करण्याची मागणी अनिल देशमुख यांनी एका याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे केली आहे. न्यायधीश एस.एस. शिंदे आणि मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे लवकरच याप्रकरणी सुनावणी होणार आहे.