सरकारी वकील विद्या पाटील खून प्रकरणी पतीला जन्मठेप

जळगाव : जळगाव प्रथमवर्ग न्यायालयात सन २०१७ पासुन सहा. सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या रेखा ऊर्फ विद्या भरत पाटील (३५, रा. सुपारीबाग, जामनेर) खून खटला जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात कोरोनाच्या अवघड परिस्थितीतही केवळ तीन महिन्यात कामकाज करून संपविण्यात आला.

जळगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सरकारी वकील असलेल्या विद्या राजपूत यांचा १३ जानेवारी २०१९ रोजी उशीने तोंड व गळा दाबून खून झाला होता. पती डॉ. भरत लालसिंग पाटील (४२, रा. जामनेर) व सासरे लालसिंग श्रीपत पाटील (७४, रा. बेलखेडे, ता. भुसावळ) या दोघांना या गुन्ह्यात अनुक्रमे १४ जानेवारी १९ व २८ जानेवारी १९ रोजी अटक करण्यात आली होती. विद्या पाटील यांचा मृत्यू झाल्यानंतर पती व सासरे या दोघांनी त्यांना जामनेर येथुन भुसावळ येथील दवाखान्यात नेले होते. प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगवेगळी कारणे सांगितली होती. भुसावळ वेगवेगळ्या दवाखान्यातील डॉक्टर व कंपोऊंडेर यांनी विद्या मयत झाली असल्याचे सांगितले होते.डॉ.राजेश मानवतकर यांनी विद्याचे पीएम करावे लागेल असे सुद्धा सांगितले होते,परंतु दोघे आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा गैरहेतुने मृतदेह परस्पर बेलखेडे (ता.भुसावळ) या मुळगाव अंत्यसंस्कारासाठी नेला, तेथे विद्या पाटील यांचा मावस भाऊ गणेश सुरळकर व बहीण प्रिया सोळंखे यांनी मृत्यूचे कारण विचारले असता हृदयविकाराने झाल्याचे पतीने सांगितले होते, मात्र चेहरा पाहिल्यानंतर शरीरावर जखमा होत्या.

प्रकरण संशयास्पद वाटल्याने विद्या यांच्या नातेवाईकांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी केली असता त्यासही पतीने विरोध केला. त्यामुळे ही माहिती वरणगाव पोलिसांना कळविण्यात आली. त्यांनी प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह वरणगाव रुग्णालयात नेला. तेथे पंचनामा करून मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन झाल्यानंतर विद्या पाटील यांचा मृत्यू गुदमरून तसेच तोंड व गळा दाबून झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार पती डॉ. भरत पाटील व सासरे लालसिंग पाटील यांच्या विरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

विद्या पाटील यांच्या चारित्र्यावर पतीकडून सतत संशय घेतला जात होता.त्या सतत मोबाइलवर बोलत असत त्यामुळे त्यांच्यावर अधिक संशय घेऊन त्यांना मारहाण केली जात होती, असे चौकशी समोर आले होते. साक्षीदारांची तपासणी देखील हेच मुद्दे पुढे आले. या खटल्यात साक्षीदारांची तपासणी दि.१५ फेब्रुवारी २०२१ रोजी सुरू होऊन दि.१६ मार्च २०२१ रोजी पुर्ण करण्यात आली,या दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यापैकी १४ साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. त्यात फिर्यादी गणेश सुरळकर, ज्या डॉक्टरांकडे विद्या यांना उपचारासाठी नेण्यात आले ते डॉ.राहुल जावळे, डॉ. राजेश मानवतकर, चुलत भाऊ सुरज सरदारसिंग पाटील, ज्या वाहनातून त्यांना दवाखान्यात व नंतर अंत्यसंस्काराला नेण्यात आले त्याचा चालक विपुल गोपाल पटेल, मुलगा दुर्वेश उर्फ सोनू भरत पाटील, बहिण प्रिया प्रमोद सोळुंखे, शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील चंद्रकांत कळसकर,वरणगाव पोलीस ठाण्याच्या तत्कालीन प्रभारी अधिकारी सारिका कोडापे, जामनेर शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा, जळगाव न्यायालयातील सरकारी वकील सुप्रीया सुरेश क्षीरसागर, जामनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे,शवविच्छेदन करणारे डॉ. निलेश देवराज व जामनेरचे वकील ज्ञानेश्वर बाबुराव बोरसे आदींच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरलेल्या आहेत.

आज जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. पी.वाय. लाडेकर यांनी विद्या पाटील यांच्या खून केला म्हणून तिचा पती डॉ.भरत पाटील याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर विद्या पाटील हीचा पती व सासरा लालसिंग पाटील यांना पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून दोघांना दोषी ठरवून प्रत्येकी चार वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली तर बचाव पक्षातर्फे एस.के. शिरुडे यांनी बाजू मांडली. दरम्यान गुन्हा घडल्यापासून पती डॉ. भरत पाटील हा कारागृहातच होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here