
यवतमाळ (घाटंजी) – मद्याच्या अधीन होत जन्मदात्रीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश अभिजीत देशमुख यांनी ही शिक्षा सुनावली आहे. ब्राह्मणी तालुका वणी येथील आरोपीस दहा हजार रुपये दंड व जन्मठेप असे या शिक्षेचे स्वरुप आहे.
ब्राह्मणी तालुका वणी येथील पीडित जन्मदात्री तिच्या मुलीला भेटण्यासाठी 19 जुलै 2021 रोजी वणी येथे गेली होती. ‘तु मुलीला भेटायला कां गेली असे म्हणून आरोपी मुलाने तिला दोन ते तिन दिवस मारहाण केली. दिनांक 23 जुलै 2021 रोजी रात्री नऊच्या सुमारास पिडितेचा पती झोपल्यानंतर आरोपी मद्याच्या नशेत घरी आला व त्याने पिडितेला जेवणाची मागणी केली. तिने जेवणाचे ताट आरोपीला त्याच्या रुममध्ये नेउन दिले. आरोपीचे जेवण झाल्यावर त्याने तिला पट्ट्याने बेदम मारहाण केली.
तुला मलम लावून देतो असे म्हणत आरोपी तिच्या अंगावर झोपला व तिचे तोंड दाबले. तिला मारून टाकण्याची धमकी त्याने दिली. आरोपीने पिडीतेचे पुर्ण कपडे काढले व त्याने तीला धमकी देत मोबाईल मधील अश्लील व्हिडीओ तिला दाखवले. रात्री तीन वाजता त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरी अत्याचार केला. तो पुन्हा असाच अत्याचार करेल या भीतीपोटी त्या माऊलीने विषारी औषध प्राशन केले.
तिची तब्येत गंभीर झाल्याने तिला तातडीने नजीकच्या सुगम हॉस्पिटल मधे दाखल करण्यात आले. सहा दिवसानंतर ती शुद्धीवर आली असता वणी पोलीस स्टेशनला 30 जुलै 2021 रोजी तिने तिच्या आरोपी मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली. गु. र. न. 604/21 भा. द. वि. कलम 376 (2) (एफ), (एन), 323, 506 नुसार दाखल या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण नाकतोडे यांनी पूर्ण केला. त्यानंतर या गुन्ह्याचे दोषारोप पत्र अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले.
सरकारी पक्षाने एकूण आठ साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाची बाजू ग्राहय धरून आरोपीस भादंवि कलम 376 (2) (एफ), 376 (2) (एन) अन्वये दोन्ही गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली व १० हजार रुपये दंड ठोठावला. भादंवि कलम 323 मध्ये एक वर्षाची शिक्षा व एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून पो. हे. काॅ. संतोष मडावी यांनी सहकार्य केले. आरोपी पक्षाची बाजू ॲड. सिद्धार्थ लोढा यांनी मांडली.







