पत्नीला कायम मुलीच होतात म्हणून केला होता खून – पतीला जन्मठेप

जळगाव : पत्नीला कायम मुलीच होतात म्हणून पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा जळगाव सत्र न्यायालयाने सुनावली आहे. या खटल्याच्या न्यायालयीन कामकाजात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांची मेहनत फळाला आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील विवेकानंद नगर तांडा येथे आरोपी पप्पु रतन पवार (31) हा त्याची मयत पत्नी कस्तुरबाई (30) व त्यांच्या तीन मुलींसह राहत होता.आरोपी पप्पु पवार हा पाचोरा येथेच एक हॉटेलवर कामाला होता,त्याला दारू पिण्याचे सुद्धा व्यसन होते. दि.09/06/2019 रोजी रात्री कस्तुराबाईला मुलीच होतात या व दारूच्या कारणाने आरोपीने कस्तुरबाईशी भांडण करून तिला शिवीगाळ केली व लाकडी दांड्याने डोक्यात मारले. त्यामुळे ती खाली पडली, त्यानंतर आरोपीच्या घराच्या शेजारी राहणारे त्याचे भाऊ व वहिनीने पाचोरा येथील रुग्णालयात घेऊन गेले. परंतु त्याठिकाणी तिला मयत घोषित करण्यात आले.
सदर घटनेची फिर्याद मयताची आई पद्मबाई सखाराम राठोड (60) रा.आनंद नगर तांडा ता.एरंडोल हिने पाचोरा पोलीस स्टेशनला भा.द.वि.कलम 302, 504 अन्वये गु.र.नं.237/19 ला आरोपी पप्पु रतन पवारचे विरुद्ध दिली.

आरोपीला या गुन्ह्याचे कामी दि.10/6/2019 रोजी अटक करण्यात आली.सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उप निरीक्षक पंकज शिंदे यांनी केले.आरोपीच्या विरुद्ध प्रथम दर्शनी पुरावा दिसुन येत असल्यामुळे आरोपीच्या विरुद्ध दोषारोप दाखल करण्यात आले. आरोपीच्या विरुद्ध सदरचा खटला सर्वप्रथम तत्कालीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जि.ए.सानप याच्या समोर चालले.त्यांच्या समक्ष या खटल्याचे कामी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी आठ साक्षीदार तपासले,परंतु त्यांची बदली झाल्यामुळे व त्यानंतर कोरोनाच्या निर्बंदामुळे सदर खटला पुढे चालु शकला नव्हता,परंतु त्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.एस.डी. जगमालानी यांच्या समोर सरकार पक्षाने उर्वरित दोन साक्षीदार तपासून ह्या खटल्याचे कामी पुरावा ठेवण्याचे काम पूर्ण केले.

या खटल्याचे कामी जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी एकूण दहा साक्षीदार तपासले. यात प्रामुख्याने आरोपीची मोठी मुलगी कु.गौरी हिची साक्ष महत्वपुर्ण ठरली कारण ही सर्व घटना तिच्या समोर घडलेली असल्यामुळे तिने सर्व घटनाक्रम जसाचा तसा न्यायालयासमोर संगीतला व घटना करणारा व्यक्ती कोण आहे असे विचारले असता तिने तिच्या वडिलांकडे म्हणजेच आरोपिकडे बोट दाखवले.या व्यतिरिक्त स्वतः फिर्यादी पद्मबाई राठोड,डॉ. निलेश देवराज पंच साक्षीदार व पो.उ.नि.पंकज शिंदे यांच्या साक्षी महत्वाच्या झाल्यात.

आज 19 मे 2021 रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.एस.डी. जगमालानी यांनी कस्तुरबाई पवार हिचा खून केला म्हणून तिचा पती पप्पु रतन पवार याला दोषी ठरवून जन्मठेपेची व 5000/- रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली.दरम्यान गुन्हा घडल्यानंतर अटक झाल्यापासून आरोपी पती पप्पु पवार हा कारागृहातच होता.आज न्यायालयाने सदरची शिक्षा व्हिडिओ कॉन्फरन्स वर सुनावणी घेऊन ठोठावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here