मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी सुरु आहे. त्यांच्यावर 100 कोटी रुपयांचा आरोप करणारे मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात देखील तक्रारी दाखल आहेत.
परमबीर सिंह त्यांच्या विरुद्ध दाखल तक्रारी अनिल देशमुख यांच्या विरोधात पत्र लिहिल्यानंतर करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र तपास यंत्रणांनी प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका परमबीर सिंह यांनी केली होती. त्यावर सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना कडक शब्दात सुनावले आहे. ‘तुम्ही महाराष्ट्र केडरचा एक महत्वाचा भाग आहात. तुम्ही तिस वर्ष महाराष्ट्रात सेवा बजावली आहे. मात्र आताच तुम्हाला तुमच्या स्वतःच्या राज्याच्या कारभारावर विश्वास नाही काय? असा धक्कादायक आरोप सर्वोच्च न्यायालयाने सिंह यांच्यावर केला आहे. न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. वी.रामसुब्रमण्यम यांच्यासमक्ष सदर सुनावणी सुरु होती. काचेच्या घरात राहणा-यांनी दगड मारु नये असे न्या. हेमंत गुप्ता यांनी परमबीर सिंह यांना सुनावले आहे. परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यामुळे राज्य सरकारला सुखद दिलासा मिळाला आहे.