मुंबई – येस बँक घोटाळा प्रकरणी अंमलबाजवणी संचालनालयाने (ईडी) बँकेचे सहसंस्थापक आणि आरोपी राणा कपूर यांना कारवाईचा दणका दिला आहे. राणा कपूर आणि त्यांच्या परिवाराच्या मालकीची 2200 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
डीएचएफएलचे प्रमोटर कपिल आणि धीरज वाधवान यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या संपत्तीवर देखील टाच आणली आहे. राणा कपूर यांची कंबाला हिल येथील इमारत तसेच नेपियन्सी रोडवरील तिन डुप्लेक्स, वरळी आणि मुंबई परिसरातील आठ फ्लॅट्स तसेच नवी दिल्ली भागातील अम्रित शेरगील मार्गावरील संपत्ती ईडीने जप्त केली आहे.
दुसऱ्या आर्थिक घोट्याळ्याच्या केसमध्ये वाधवान बंधू आधीच सीबीआयच्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी अद्याप सुरु आहे. कपिल आणि धीरज वाधवान यांची मुंबईच्या खार भागातील १२ फ्लॅट्स, लंडनमधील २ फ्लॅट्, ऑस्ट्रेलियामधील संपत्ती, मुळशी आणि पुण्यातील जमिनी , ५ आलिशान गाड्या ईडीने जप्त केल्या आहेत.
३४४ बँक खात्यावर देखील जप्ती आणली आहे.दरम्यान येस बँकेच्या राणा कपूरच्या मालकीची मुंबई, पुण्यासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि यूकेमध्ये असलेली मालमत्ता जप्त केली आहे.
येस बँकेचे राणा कपूर व त्यांच्या दोघा मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेन्चर्स या घोटाळ्यातून सहाशे कोटी रुपये मिळाले होते. याची ईडी चौकशी करत आहे. ३०००० कोटींमधून अधिक रक्कम कर्ज म्हणून बेकायदा मंजूर केल्याचा राणा कपूर यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
सन २००४ मध्ये त्यांनी येस बँक स्थापन केली होती. सन २०१९ पर्यंत ते बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ होते. याच कालावधीत पैशांची अफरातफर झाली आहे. येस बँकेने डीएचएफएलला ३७५० कोटी रुपये आणि डीएचएफएलच्या नियंत्रणाखाली असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना ७५० कोटी रुपयांचे कर्ज दिले.