मुंबई : हिंदी सिनेमासृष्टीत बडी हस्ती असलेले अमिताभ बच्चन अर्थात बिग बी यांच्या प्रतिक्षा बंगल्याची भिंत मुंबई महापालिका पाडणार आहे. जुहू परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्ग रुंद करण्यासाठी या बंगल्याची भिंत पाडण्यात येणार आहे.
सन 2017 मधे भिंत पाडण्यासाठी बिग बी यांना नोटीस देण्यात आली होती. बिग बी यांनी या नोटीसला केराची टोपली दाखवली होती असे समजते. बिग बी यांचा बंगला असलेल्या जुहू परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे हा रस्ता 45 फुटावरुन 60 फुट केला जाणार आहे. या रुंदीकरणासाठी उद्योजक सत्यमुर्ती व बिग बी या दोघा बंगल्यांचा अडथळा होता. त्यापैकी सत्यमुर्ती यांनी न्यायालयात धाव घेत स्थगिती मिळवली होती. मात्र नंतर त्यांच्या बंगल्याची भिंत पाडण्यात आली.
मात्र अमिताभ बच्चन यांनी याप्रकरणी कुठलाही प्रतिसाद दिला नव्हता. बिएमसी देखील बिग बी यांच्या बंगल्याच्या भिंतीला हात लावत नव्हती. त्यामुळे बीएमसीवर दुजाभावाचा आरोप केला जात होता. बिग बी यांचे मुंबईत चार निवासस्थान आहे. काही महिन्यांपुर्वी त्यांनी चौथे नवे निवासस्थान घेतले आहे. प्रतिक्षा या जागी कुणीही रहात नसल्याचे समजते. जलसा या बंगल्यात बच्चन परिवार वास्तव्याला आहे. जनक या बंगल्यातून कार्यालयीन कामकाज चालते.