महाराष्ट्रातील आत्महत्यांच्या हंगामाची चिंता कुणाला?

सिने अभिनेता आमिर खान याने त्याच्या दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिल्याची बातमी काही चॅनल्सनी अर्धा तास दाखवली. बऱ्याच जणांनी गळा काढला. फिल्मी “बदमाशी” असे काहींना वाटले. असल्या नेहमीच्या कंडोमछाप किरकोळ घटनांपेक्षा महाराष्ट्रात अलीकडे दिसून येणाऱ्या आत्महत्यांच्या बेमौसमी – मौसमी हंगामाची मात्र कुणालाच चिंता वाटत नाही याची खंत वाटते. एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी मिळाली नाही. स्वप्नील लोणकर नावाच्या तरुणाची आत्महत्या, लॉकडाऊन उठवण्याचे नाव नाही, चित्रपट अभिनेते – कलावंत – मॉडेल, कलाकार अनेक हताश झाले व मरण कवटाळताहेत.

“मुलांना शीतपेय आणून देत घरात जाऊन तरुणाने केली आत्महत्या”, “झाडाला घेतला गळफास”, “पुण्यातल्या डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या”, “बायको मुलांना मारुन आत्महत्या” काय तर म्हणे पत्नीच्या प्रियकराने शिक्षकाला दारु पाजून कार खाली चिरडले. या बातम्या काय सांगतात. मुंबई – ठाणे – कोळसेवाडीत दोन तरुण – तरुणीला म्हणे गुंडांनी केली  मारहाण. म्हणजे राज्यातील महिला असुरक्षित नाही काय? जळगाव जिल्ह्यात तर सहज एखादे चॉकलेट खावे इतक्या सहजतेने आत्महत्यांचा हंगाम दिसून येत आहे. राज्यभरातील राजकारणी विधानसभेचा अध्यक्ष कोण? कधी निवडणार? ठाकरे सरकार केव्हा पडणार? हे सरकार पाडण्यासाठी रणगाडे आणा असे म्हणणाऱ्या संजय राऊतांनी भाजपच्या आशिष शेलारांची घेतली गुप्त भेट – अशा खेळात अडकले आहेत. विधानसभेत 288 आमदार असले तरी त्यात आणखी बाराची भर घालण्याचे वाद आहेत. राज्यपाल म्हणे ही आणखी नवी खोगीरभरती करायला तयार नाहीत. रोज रोज नव्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. आपण मुख्यमंत्री पदावर बसलो म्हणजे चुटकीसरशी आरक्षणासकट सारे प्रश्न सोडवू असे काही मान्यवरांना वाटते. राज्यात पुन्हा सत्तेची नवी मांडणी करण्यासाठी “ऑपरेशन लोटस” चा फड लागेल अशा गप्पांना उधान आले आहे. राजकारणातल्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना त्याची दरवर्षी अब्जावधी रुपये देणारी कामधेनू त्यांच्या दारात हवी आहे. ही कामधेनू म्हणजे मुंबई महापालिकेची सत्ता, मंत्रिपदे, बँका, साखर कारखानदारी. “हमारी नोटोसे यारी – भाड मे जाये बाकी दुनियादारी” अशा रस्सीखेचाच्या खेळात सामान्य जनता आज कशी जगते किंवा मरते याच्याशी कुणाचे देणे – घेणे लागत नाही. हीच बाब महाराष्ट्राच्या समाजहितासाठी चिंताजनक नाही काय?

कधीकाळी महाराष्ट्रातील दोन पिढ्या सुप्रसिद्ध साहित्यिक( बहुदा खांडेकर) यांच्या “लाखाची लॉटरी” चा धडा वाचून पुढे गेली. सरळमार्गी नोकरदार मध्यमवर्गीयांनी कधीकाळी फक्त एक लाख रुपयांचे स्वप्न हेच टार्गेट उराशी बाळगून स्वतःचे छोटे घरकुल – सुखी कुटुंबाची स्वप्ने पाहिली. रोज रोज येणाऱ्या तरुणांच्या – कर्त्या पुरुषांच्या – तरुणींच्या, वैफल्यग्रस्तांच्या आत्महत्येचा पाऊस पाडणार्‍या घटना बघून अस्वस्थ होत नसतील ते राज्यकर्ते लोकहितकारी कसे म्हणायचे? पैशासाठी तर चोर डाकू देखील दिवस रात्री धुमाकूळ घालतात.

फार पूर्वीच्या काळी राजेशाही होती. काही राजे म्हणे रात्री वेष पालटून आपली प्रजा कशी जगते? ती आपल्या राज्यात  सुखी आहे की नाही? हे स्वतः बघत असत. आताच्यांना प्रजेची चिंता किती हा पीएचडी प्रबंधाचा विषय ठरावा अशी स्थिती दिसते. राज्यात दारुचा महापूर खुला करुन वर्षाला तीस हजार कोटी रुपयांचे उत्पन्न 50 हजार ते एक लाख कोटीपर्यंत नेण्याची कुणाला महत्त्वाकांक्षा आहे. कुणाला “नाईटलाइफ” रात्रभर चालू ठेवून शेकडो कोटी दरमहा हवे आहेत? खरे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक अपवाद वगळला तर कुणालाच रयतेच्या (प्रजेच्या)  हिताची चिंता दिसत नाही. हिंदुस्थानातील सहाशेच्यावर संस्थानिकांनी राजेशाही भोगली. “राजा” म्हणजे मोठा लुटारु – दरोडेखोर अशा भूमिकेत काही राजे वावरले. अलीकडेच “बाहुबली” चित्रपटात राजाच्या सोन्याच्या सिंहासनासाठी प्रजेकडून त्यांचे सोने हिसकावण्याचा आणि त्यासाठी त्यांना खांबाला बांधून गुरासारखे झोडपण्याचे दृष्य त्या चित्रपटात होते. बाहुबली अन कटाप्पाच्या गोंगाटात हा अन्याय कुणालाच दिसला नाही. आजही प्रजेला नवनव्या करांच्या काठीने झोडपणे सुरुच आहे.

मुंबई मनपाने म्हणे केवळ मास्क वापरला नाही म्हणून जनतेकडून 58 कोटी रुपयांचा दंड वसूल केल्याचे म्हटले जात आहे.  रोजची महागाई त्यात “कोरोना बिजनेस” ने जनतेचे पार कंबरडे मोडले. लोकांचे संसार मोडून पडत आहेत. समाज जीवनातून विवाहसंस्था हद्दपार होऊ घातली आहे. वैफल्यग्रस्त जीव जीवनाला कंटाळून आत्महत्या करत आहेत. हा आमच्या लोकशाहीचा, राज्यकर्त्यांचा पराभव नव्हे का? स्वातंत्र्यपूर्व जुन्या ऐतिहासिक कालखंडात मुगल साम्राज्य, निजामशाही, आदिलशाही, औरंगजेब, पृथ्वीराज सिंह, राणा प्रताप, छत्रपती शिवराय आणि या सर्व राजे महाराजे यांचे सरदार – जहागीरदार यांच्या जहागिरीसाठी  झालेले  संघर्ष आजही तसेच चालु आहेत. जुने सरंजामदार – जहागीरदार आज जिल्ह्या-जिल्ह्यात मंत्री – आमदार या स्वरुपात इतिहासाचा कित्ता गिरवतांना दिसतात. या सगळ्यांना सर्व सुखे पायाशी आणून सोडणाऱ्या सातशे पिढ्यांची आताच सोय करणारी सत्ता हवी आहे. त्यात रोज  शेकडो मेले तरी चिंता आहेच कुणाला? जुन्या काळात दोन राजांच्या ऐतिहासिक आमने – सामने लढाईत मारले गेलेल्या दोन्ही बाजूंच्या सैनिकांच्या मृतदेहांचे ढिगारे, जखमी सैनिक रणांगणावर जखमी अवस्थेत तसेच सोडून विजयी राजा विजयाचा जल्लोष करत सत्ता गाजवण्यास जात असे. तेच चित्र आज चालू दिसते. लोकांना सुखी करण्याची चिंता आहे कुणाला? ना राज्यकर्त्यांना ना जनतेला? सुखाचा हक्क विसरलेल्यांना जागे तरी कोण कसे करणार?

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here