राजकीय अभयामुळे संदेश काजळे माजला !
डीजे वादकांवर अमानुष अत्याचार करु लागला !!
नाशिक : राजकीय आश्रयस्थान हे गुन्हेगारी विश्वातील शेवटचे स्थान अर्थात प्लॅटफॉर्म असल्याचे म्हटले जाते. गुन्हेगारांना जनमानसात कुठलेही स्थान नसते. त्यामुळे राजकीय आश्रय घेवून जनतेच्या मनावर बळजबरीने राज्य करण्याचा प्रयत्न गुन्हेगार करत असतात. ज्या गुन्हेगारांना आपले काळे कारनामे लपवायचे असतात ते गुन्हेगार राजकीय पाठबळ घेण्यासाठी प्रयत्नशील असतात हे सर्वश्रुत आहे. एकदा का आपल्याला सत्ताधारी पक्षनेत्याचा राजाश्रय मिळाला म्हणजे आपण कुठलेही गैरकृत्य करू शकतो, नव्हे आपल्याला तसा अलिखित परवानाच मिळाल्याचे गुन्हेगार समजत असतात. सत्ताधारी नेत्यांना देखील अशा गुंडांची गरज असतेच. त्यामुळे ते या गुंडाच्या बळाचा वापर आपल्या स्वार्थासाठी करुन घेत असतात. त्या बदल्यात पोलिस अथवा महसुल कारवाईपासून आपला बचाव करण्याचे काम हे गुंड करुन घेत असतात.
भा.ज.पा.च्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे नाशिक येथे वर्चस्व आहे. नाशिक येथील संदेश सुर्यकांत काजळे हा प्रख्यात गुन्हेगार म्हणून नावारुपाला आला आहे. काही बड्या लोकांच्या आशिर्वादामुळे त्याने गुन्हेगारी क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्याला आ.प्रा.देवयानी फरांदे यांचा राजकीय आशिर्वाद असल्याचे लोक खुलेआम बोलतात. त्यामुळे लोक त्याला “भाई” या नावाने हाक मारतात. आपल्याला मिळालेली “भाई” ही पदवी जपण्यासाठी तो आपली गुन्हेगारी वेळोवेळी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या अनुशंगाने त्याने आपल्या अख्त्यारीत गुन्हेगारांची एक टोळी निर्माण केली असून तो त्या टोळीचा म्होरक्या आहे.
राजकीय क्षेत्रातील व्यक्ती त्याचा व त्याच्या टोळीचा राजकारणासाठी वापर करून घेत असल्याचे बोलले जाते. सध्या तो भाजपाच्या आ.प्रा. देवयानी फरांदे यांचा कट्टर समर्थक म्हणून नावारूपास आला असून तसा तोरा त्याच्याकडून मिरवला जातो. जणू काही गैरकृत्य करण्याचा परवानाच आपल्याला मिळाला आहे अशा तोऱ्यात तो वावरत असतो. निखिल महेंद्र पवार (रा. अशोक स्तंभ) हा देखील भाजपाचा सक्रिय कार्यकर्ता असून तो आ. प्रा. देवयानी फरांदे (भाजपा) यांचा अतिशय निकटवर्तीय समजला जातो. संदेश काजळे या अट्टल गुन्हेगाराचा प्रा. देवयानी फरांदे आणि निखिल पवार या दोघांशी घनिष्ठ संबंध आहेत.
दि. 9 जानेवारी या दिवशी संदेश काजळे याची जन्मतारीख असल्याने या दिवशी त्याचा वाढदिवस मोठया धुमधडाक्यात करण्याचे त्याच्या गुंडांच्या टोळीने ठरवले. वाढदिवस कोठे साजरा करायचा? याची चर्चा सुरु असतांना सर्वांना निखिल पवार याच्या मालकीचे शिवगंगा फार्म आठवले. या ठिकाणी संदेशचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. संदेशचे निखिल पवारसोबत घनिष्ट संबंध असल्याने त्याने लगेच आपले फार्म हाऊस वाढदिवस पार्टीसाठी त्यांना उपलब्ध करुन दिले.
नाशिक तालुक्यातील दरी-मातोरी गावाच्या शिवारात निखील पवार याच्या मालकीचे शिवगंगा फार्म हाऊस आहे. भाई संदेशच्या वाढदिवसाची पार्टी असल्याने जंगी तयारी सुरु करण्यात आली. जे लागेल त्याची सोय करण्यात आली. या पार्टीत रंगत यावी म्हणून डीजे वाजवण्याची सुपारी देण्यात आली.
गुरुवार दि. 9 जानेवारीच्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भाईगिरी करणा-या संदेशच्या जंगी पार्टीला सुरुवात झाली. दारुचे पेग रिचवत पार्टीला आलेली सर्व मित्रमंडळी डीजेच्या तालावर नाचू लागली. प्रथमेश खामकर (वय 22) व विनय पगारे (वय 22) हे दोन्ही डीजे वादक डीजे वाजवत होते आणि पार्टीला आलेले दारूचा आस्वाद घेत रंगात येत नाचत होते. बघता बघता सर्वजण बेभान झाले होते. रात्री 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत डीजेवादक सतत डीजे वाजवतच राहिले, मात्र घड्याळात रात्रीचे दहा वाजताच डीजेवादकांनी वाद्य वाजवण्यास नकार दिला. कायद्याचा आदर राखत त्यांनी डीजे वाजवणे बंद केले. यामुळे भाई संदेश काजळे व त्याचे मित्रमंडळ वाद्यवादकांवर खवळले. आधीच राजकीय वर्चस्वाची व आ.प्रा. देवयानी फरांदे भाजपा यांचे आपण कार्यकर्ते असल्याची हवा डोक्यात घुसलेली आणि त्यात दारूची नशा चढलेली होती. त्यांनी दोघा वाद्य वादकांना बेदम मारहाण करून अमानुष शारिरीक व मानसिक छळ केला. इतका की ऐकणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला.
भाई संदेश काजळे या कुख्यात गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निखिल पवारने पार्टीचे नियोजन केले होते. त्यासाठी सिंगल बँडचा डीजे चालवण्यासाठी आनंद चित्रकते यांना ऑर्डर देण्यात आली. हा डीजे बँड घेवून विनय पगारे (रा. ओझर) व प्रथमेश खामकर (रा. कर्णनगर, नाशिक) हे दोघे जण पार्टीत बँड वाजवण्यासाठी गेले होते. रात्री साडेआठ वाजता पार्टीसाठी मित्र जमू लागल्यानंतर संदेश काजळे हा पार्टीच्या ठिकाणी आला. रात्री ३० ते ४० जणांच्या उपस्थितीत संदेश काजळे याने केक कापल्यानंतर पुन्हा पार्टी रंगू लागली.
मद्याच्या नशेत बेधुंद होवून सर्वजण नाचत असतांना रात्रीचे दहा वाजल्याने आम्ही आता डीजे बंद करतोय, कायद्याप्रमाणे आम्हाला वागावे लागेल, असे डीजे वादकांनी सांगितले असता पार्टीत आलेल्या काजळेच्या मित्रांनी त्यांना धमकावण्यास सुरूवात केली. आम्हाला कायदाबियदा सांगू नका. कायदा आणि पोलीस आमच्या खिशात आहे. आम्ही भाजपाच्या आ. प्रा. देवयानी फरांदे यांचे कार्यकर्ते असून पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक हे आम्हाला हात लावू शकत नाही. डीजे बंद करू नका.
संदेश काजळे सांगेल तोपर्यंत वाजवत रहा असे सांगितल्याने दोघा डीजे वादकांचा नाईलाज झाला. सर्वजण त्यांना शिवीगाळ व दमबाजी करू लागल्याने पहाटे तीन वाजेपर्यंत त्यांना डीजे वाजवावा लागला. डीजे मालक आनंद चित्रकते हा देखील पार्टीच्या ठिकाणी आला असता त्याच्यावर संदेश काजळे चिडला व त्यास हाकलून देत त्याने स्वतःच्या मोबाईल फोनवरील गाणे डीजेला कनेक्ट करून वाजवणे सुरू केले. गाणे वाजवले जात असतांना त्यात व्यत्यय येवू लागला व डीजे बंद पडू लागल्याने नशेत असलेल्या सर्वांचा रंगाचा भंग होवू लागला. त्यामुळे संदेश चिडला आणि भाई चिडल्याने संदेशचा भाऊ प्रितेश याला डीजेवादकाचा राग आला. दोघांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत त्याने खामकरच्या गालावर चापट मारली. त्यानंतर पहिल्या अंकाला सुरूवात झाली.
स्वतः संदेश, प्रितेश व सिद्धेश रा. खैरे गल्ली, सोनू व सँडी रिक्षावाला रा. मोरवाडी यांच्यासह काही तरूणांनी दोघा वाद्यवादकांना मारहाण करायला सुरूवात केली. गरीब बिचारे दोघे वाद्यवादक राक्षसांच्या ताब्यात सापडले होते. लाथा-बुक्क्यांसह चामड्यांच्या पट्ट्यांनी त्यांना मारहाण करू लागले. तुम्ही कोणत्या जातीचे आहात अशीही विचारणा त्यांनी केली. जात समजताच पगारे यास जातीयवादी शिवीगाळ करत त्याच्यावर क्रूरपणे हल्ला चढवला.
सर्व जण आळीपाळीने दोघांना अमानुषपणे मारहाण करत होते. शिवाय दोघांना धमकावण्यासाठी संदेश काजळे याने हवेत गोळीबार तर केलाच, शिवाय हातातील बॅटरीसारख्या यंत्रातून दोघांना विजेचे चटकेही दिले. कोणी लाथा मारू लागले, तर कुणी त्यांच्या डोक्याचे केस ओढू लागले. कुणी त्यांच्या गालावर चापट्या मारू लागले, तर कुणी चामड्याच्या पट्ट्याने त्यांना मारहाण करू लागले. दोघे जण रडू-ओरडू लागताच ते मोठमोठ्याने हसू , लागले. अतिशय क्रूरपणे व अमानुषपणे त्यांना मारहाण करून एकप्रकारे वेगळी मजा लुटू लागले.
दोघे वाद्यवादक भयभीत झाले होते. मुकाट्याने या लोकांकडून होणारा अत्याचार-मारहाण सहन करू लागले. ते दोघे गयावया करत होते. सोडून द्या आम्हाला अशी याचना करत होते. पण कुणालाही त्यांची दया येत नव्हती. उलट या दोघांमुळे आपल्या पार्टीचा भंग झाला असे म्हणत दोघांवर सर्व जण तुटून पडले होते. मारहाण करता-
करता कुणी बॅटरीच्या सहाय्याने तर कुणी पेटत्या सिगारेटचे चटके त्यांना देवू लागले. त्यानंतर कुणी त्यांच्या अंगावर लघवी केली, तर काहींनी त्यांच्या गुदद्वारात पेट्रोल टाकले. मध्येच कुणी त्यांना बळजबरीने दारू पाजू लागले. एवढ्यावरच ते सैतान थांबले नाहीत, तर दोघा वाद्यवादकांवर किळसवाणे अनैसर्गिक लैंगिक
अत्याचार करु लागले. हा अत्याचाराचा किळसवाणा प्रकार संदेश काजळे यास सकाळी झोप लागेपर्यंत सुरू होता. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यातील काही तरूणांनी या दोघा वादकांना कसेतरी पळवून लावले. दोघे कसेतरी धडपडत नजिकच्या चहाच्या टपरीवर गेले. त्यांनी तेथून मुख्य डीजेचालक करण शिंदे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती देवून मदत मागितली. या प्रकारानंतर धास्तावलेल्या वादकांना प्रचंड दमबाजी करण्यात आली. हे प्रकरण दाबावे म्हणून एका आमदार महिलेने पोलीस यंत्रणेवर दबाव आणला. दुसऱ्या दिवशी मौन बाळगल्यानंतर या प्रकरणाची खूप वाच्यता झाल्याने काहींनी त्यांना धीर दिल्यावर तिसऱ्या दिवशी शनिवारी दोघा पिडीतांनी नाशिक तालुका पोलीस ठाणे गाठले आणि झालेल्या अत्याचाराची माहिती देत फिर्याद दाखल केली. आरोपी संदेश काजळे याच्यासह आठ ते दहा जणांविरोधात दोघा वादकांना ठार मारण्याचा प्रयत्न, अॅट्रॉसिटी, अनैसर्गिक अत्याचार व राईट आदी गुन्हे दाखल करण्यात आले.
गुन्हा दाखल होताच अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी गुन्हे शाखेच्या पथकास आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. के. पाटील व नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्या पथकाने लगेच सुत्रे हलवून फार्म हाऊसचा मालक निखिल राजेंद्र पवार, प्रितेश काजळे, संदेश दिलीप वाघ, ज्ञानेश्वर शिरसाठ, रोहित जगदीश डोळस, संदीप अजबराव भाळवकर यांना अटक केली. मुख्य आरोपी संदेश काजळे व इतर साथीदार मात्र फरार झाले. पिडीतांनी भाजपाच्या आ.प्रा. देवयानी फरांदे यांचे आरोपी कार्यकर्ते असून त्यांच्या नावाने दमबाजी केली असा आरोप केला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. शिवाय निखिल पवार यास अटक करून नेतांना आ. फरांदे यांच्या घरातून अटक केल्याची चर्चा पसरली. त्यामुळे या गुन्हयात त्यांना सहआरोपी करावे अशी मागणी काँग्रेसच्या नेत्या हेमलता पाटील यांनी केली.
प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून प्रा.फरांदे यांनी हात झटकले. आरोपींशी काहीही संबंध नसून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणाने राजकीय वातावरण तापले.
संदेश काजळे अट्टल गुन्हेगार असून तो कथित आमदार आत्याच्या जीवावर दहशत माजवत असल्याची चर्चा सुरु होती. भाजपच्या एका नगरसेवकाला अनधिकृत इमारतीशी संबंधित जाब विचारल्याने काजळेने धमकावल्याचे प्रकरणही आत्याच्या दबावामुळे दाबल्याची चर्चा या निमित्ताने सुरु होती. दरम्यान खूप टीकेची झोड उठल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. ते आरोपींचा शोध घेवू लागले. संदेश काजळे व त्याचे साथीदार नंदुरबार जिल्हयात नवापूर-सुरत रस्त्यावर लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नवापूरजवळील भाजपाच्या एका व्यक्तीच्या मालकीच्या फार्म हाऊसवर जावून पोलिसांनी संदेश काजळे, भूषण राजेंद्र सुर्वे (वय 30) रा. भाईजीनगर, धुळे व रविंद्र दत्तात्रय सुर्यवंशी (वय 30) रा. मेरी लिंक रोड, बळी मंदिराजवळ, नाशिक यांना अटक केली.
भाजपचे विपुल शहा यांच्या वडीलांच्या मालकीचा तो फार्म हाऊस असल्याचे समजते. वैभव गावित रा. नंदुरबार याच्या सांगण्यावरून संदेशला येथे आश्रय दिला होता व तो अजमेरला पळून जाण्याच्या बेतात होता. तत्पूर्वीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. वैभव गावित हे माजी खासदार माणिकराव गावित यांचे पुतणे आहेत. पोलिसांनी प्रितेश विलास काजळे रा. विजयनगर, सिडको, निखिल राजेंद्र पवार रा. अशोक स्तंभ, संदेश दिलीप वाघ रा. आरटीओ कॉर्नर, दिंडोरी रोड अभिषेक उर्फ सोनू ज्ञानेश्वर शिरसाठ रा. सिडको, रोहित जगदीश डोळस रा. सिडको, संदीप उर्फ सँडी अजबराव माळोकर, भूषण राजेंद्र सुर्वे रा. धुळे, रविंद्र दत्तात्रय सुर्यवंशी रा. नाशिक व बर्थ डे बॉय संदेश सुर्यकांत काजळे या सर्वांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत, सागर शिंपी, सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र दिवटे, रविंद्र शिलावट, दिपक अहीरे, नामदेव खैरणार, संदीप हांडगे, जालींदर खराटे, अमोल घुगे, प्रदीप राठोड, प्रदीप बहीरम या पथकाने ही कामगिरी बजावली.
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सी.एल.थूल यांनी नाशिक येथे भेट देवून सर्व प्रकरणाची माहिती घेतली. दोषींना कठोर शासन व्हायला हवे. यासाठी अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश त्यांनी पोलिसांना दिले. या खुनाबरोबर असंख्य गुन्हे संदेश काजळेवर दाखल आहेत. मध्यंतरी त्याला तडीपारीसह 110 (ई) (ग) ची कारवाई करण्यात आली होती. मात्र राजकीय बड्या व्यक्तीच्या आशिर्वादामुळे त्याची गुंडगिरी वाढली होती अशी चर्चा या निमित्ताने सुरु होती.