ईव्हीएम मशीनबाबातची याचिका फेटाळली, केला दंड

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबत विरोधकांकडून कित्येकदा संशय निर्माण करण्यात आला आहे. ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न निर्माण करणारी एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावलीआहे. सदर याचिका प्रसिद्धीसाठी दाखल करण्यात आल्याचे म्हणत याचिकाकर्त्यालाच दहा हजार रुपयांचा दंड देखील करण्यात आला आहे. याचिकाकर्त्याने ईव्हीएम मशीनबाबत न्यायालयात प्रश्न निर्माण केले मात्र त्याच्याकडे ईव्हीएम मशीबबाबतची पुरेशी व विशिष्ट माहिती नव्हती.

येणा-या पुढील निवडणूका बॅलेट पेपरने कराव्या अशी मागणी याचिकाकर्त्याने न्यायालयाकडे केली होती. जगातील विविध देशांमधे बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूका सुरु झाल्या असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. निवडणूकांमधे ईव्हीएमने सुरुवात केलेल्या देशांनी पुन्हा बॅलेट पेपरचा वापर सुरु केला असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. आपल्या देशातील अनेक राजकीय व्यक्तींचा ईव्हीएमवर विश्वास नसून केवळ केंद्रीय निवडणूक आयोगाचा असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

सुनावणीच्या वेळी याचिकाकर्त्याकडे न्यायालयाने ईव्हीएम मशीनमधे गडबड असल्याबाबतचा पुरावा मागीतला. त्यावर याचिकाकर्त्याने जर्मनीच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील ईव्हीएम मशिनचा वापर असंवैधानिक असल्याचे घोषित केले असल्याचे म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here