अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस आजन्म कारावास

अकोट : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या लासूर येथील रहिवासी तरुणाला दोषी ठरवत पोस्को कायद्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तत्कालीन सहायक पोलिस निरिक्षक शुभांगी मुकुंद कोरडे (दिवेकर) यांनी या गुन्ह्याचा तपास पुर्ण केला आहे. 29 जून 2017 रोजी फिर्यादीची मुलगी शिष्यवृत्तीचे पैसे काढण्यासाठी व शिकवणी लावण्याकामी घरातून गेली होती. सायंकाळ झाली तरी ती घरी परत आली नव्हती. फिर्यादीसह इतर नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला होता. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. याप्रकरणी आकोट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेतील आरोपी मंगेश महादेव चव्हाण याने पिडीतेला सुरत येथे नेले होते. तपासात 29 सप्टेबर रोजी पिडीता व आरोपी या दोघांना अकोट पोलिस स्टेशनला हजर करण्यात आले. आरोपीला अटक केल्यानंतर पिडीतेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. पिडीतेच्या जवाबानुसार तसेच वैद्यकीय तपासणीअंती ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या गुन्ह्यात आरोपीविरुद्ध कलम 366, 376(2) (जे) लावण्यात आले. तसेच पिडीता अल्पवयीन असल्याचे देखील सिद्ध झाले. त्यामुळे या गुन्ह्यात पोस्को कायद्यान्वये कलम 3,4,5 (एल) (एन) (जे), 6 देखील वाढवण्यात आले.

या गुन्ह्याच्या सिद्धतेसाठी एकुण सोळा साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध झाल्यामुळे जिल्हा व सत्र न्यायाधीश – 1 चकोर श्रीकृष्ण बाविस्कर यांच्या न्यायालयाने आरोपी मंगेश महादेव चव्हाण याला बालकांचे लैगिंक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम, 2012 च्या 3 (अ) सह 4 या कलमानुसार 10 वर्षांचा सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षांची शिक्षा, बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम, 2012 च्या 6 या कलमांतर्गत नैसर्गिक जीवनाच्या अंतापर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा तसेच 20 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन वर्षांची शिक्षा, कलम 363 नुसार शिक्षापात्र गुन्ह्यासाठी आरोपीस सात वर्षाची सश्रम कारावास, सहा हजार दंड व दंड न भरल्यास एक वर्षांची अधिकची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय आरोपीकडून द्रव्यदंडाची रक्कम वसूल झाल्यास त्यातील 75 टक्के रक्कम पिडीतेस भरपाई म्हणून देण्याचा आदेश देण्यात आला. या वेळी सरकार पक्षाच्या बाजूने अ‍ॅड. जी. एल. इंगोले यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. पोलिस हे.कॉ. संजय श्रीकृष्ण पोटे यांनी पैरवी म्हणून कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here