जळगाव : भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास संस्थापक अण्णा हजारे यांनी आपले जन आंदोलन भविष्यात देखील सुरुच ठेऊन आंदोलनात सहभागी सदस्यांना प्रेरणा द्यावी या मागणीसाठी समर्थक कार्यकर्त्यांची एक बैठक राळेगणसिद्धी येथे झाली. यावेळी राज्यातील माजी जिल्हाध्यक्ष, संघटक, निमंत्रक यांनी आंदोलन जोमाने पुढे नेले जाईल अशी ग्वाही अण्णांना दिले.
गेल्या सुमारे दोन वर्षापूर्वी अण्णा हजारे यांनी न्यासाच्या राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारणी बरखास्त केल्या होत्या. त्यामुळे आंदोलनाची गती काही प्रमाणात कमी झाली होती. अण्णांच्या पुढील निर्णय व आंदोलनाकडे माजी जिल्हाध्यक्षांसह सदस्य व ट्रस्टींचे लक्ष लागून होते.
18 ऑगस्ट रोजी राळेगणसिद्धी येथे झालेल्या बैठकीत अण्णांनी पुढील आंदोलनाची दिशा लवकरच जोमाने सुरु केली जाणार असल्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. यावेळी बैठक यशस्वीतेसाठी दत्ता आवारी, कैलास पठारे, शेख अन्सार यांनी परिश्रम घेतले.