अकोट – दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस दोषी ठरवत येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सागर दीपक लबडे, (21) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
15 जून 2018 रोजी शहर पोलिस स्टेशन हद्दीत दुपारी तीन वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीचे आईवडील शेतात मजुरीसाठी गेले होते. तिचे बहीण भाऊ घरातच होते. पीडित अल्पवयीन मुलगी दारात उभी असल्याची संधी साधत सागर लबडे याने तिच्यावर अत्याचार केले.
पीडितेचे आईवडील शेतातून घरी आल्यानंतर तिने घडलेला वृतांत त्यांना कथन केला. त्याच दिवशी सागर लबडे याच्याविरुद्ध शहर पोलिस स्टेशनला भा.द.वि. 376 (3), सह कलम 3 व 4 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 च्या कलम 3 सह 4 सह 18 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच आरोपीला अटक देखील करण्यात आली.
या घटनेचे तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक शुभांगी कोरडे(दिवेकर) यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात न्यायालयाने आठ साक्षीदार तपासले. सरकार तसेच बचाव पक्षाची बाजू ऐकुन घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे सिद्ध झाले. सत्र न्यायधीश चकोर बाविस्कर यांनी निर्णय देत आरोपीला आरोपीला बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 च्या कलम 3 सह 4 सह 18 कलमानुसार शिक्षापात्र गुन्ह्यासाठी वेगळी शिक्षा न देता, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण 2012 अधियम व भादंवीच्या 376 (3) 511 नुसार दहा वर्षे तुरुंगवास तसेच पंधरा हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. द्रव्यदंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. अजीत देशमुख यांनी युक्तिवाद केला.