औरंगाबाद : विवाहाचे आमिष दाखवत विवाहीतेसोबत राहणा-या प्रियकराने सदर महिलेची हत्या केल्याप्रकरणी येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायधिश ए. आर. कुरेशी यांनी आरोपीस जन्मठेप, तिन वर्ष सक्तमजुरी व अन्य कलमाखाली 25 हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. सदर विवाहीतेने प्रियकराकडे लग्नाचा तगादा लावत बहिणीच्या लग्नात गदारोळ घालण्याची धमकी दिली होती. त्यामुळे आरोपीने तिची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर पेट्रोल टाकत मृतदेह जाळून टाकला होता. औरंगाबादच्या हनुमान नगर येथे सुमारे पाच वर्षापुर्वी झालेल्या या घटनेचा निकाल देण्यात आला आहे. शैलेश ऊर्फ सनी अजय बेंजामिन (25), रा. एन ६, सिडको असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
मृत चंद्रकला ऊर्फ चंदा ऊर्फ जोत्स्ना अनिल अंभोरे (35), न्यू हनुमाननगर, पुंडलिकनगर औरंगाबाद या महिलेचा भाऊ तात्या आंबू शिवरकर यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. चंद्रकला हिचे सुमारे दहा वर्षांपूर्वी अनिल अंभोरे (हिंगनघाट जिल्हा वर्धा) याच्यासोबत विवाह झाला होता. मुलगी झाल्याचे कारण पुढे करत पतीने तिला सोडून दिले होते. त्यामुळे चंद्रकला तिचा भाऊ तात्या याच्यासोबत रहात होती.
यातील आरोपी शैलेश उर्फ सनी बेंजामीन हा वाहनचालक असून तो नेहमी जालना येथे ये जा करत होता. त्याची चंद्रकलासोबत ओळख झाली व नंतर प्रेम झाले. विवाहाचे आमिष दाखवत त्याने चंद्रकला हिस तिच्या दोन वर्षाच्या मुलीसह औरंगाबाद येथे आणले होते. हनुमान नगर भागात भाड्याच्या खोलीत रहात असतांना चंद्रकला हिने त्याच्याकडे विवाहाचा तगादा लावला होता. 15 जून रोजी तिने नेहमीप्रमाणे विवाहाचा तगादा लावला. विवाह केला नाही तर तुझ्या बहिणीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात येऊन गोंधळ घालीन अशी धमकी तिने त्याला दिली होती. त्यामुळे चिडून जाऊन शैलेश याने तिच्या तोंडात ओढणीचा बोळा कोंबून गळा दाबून तिची हत्या केली होती. तिच्या मुलीला तिच्या मामाच्या घराकडे नेऊन सोडून दिले होते. आई आजारी असून तिचा मोबाईल पाण्यात पडला असून तो बंद झाला असल्याचे त्याने तिच्या मुलीला सांगत सोडून पलायान केले होते. त्यानंतर पाच लिटर पेट्रोल विकत घेत त्याने चंद्रकलाचा मृतदेह मध्यरात्री चिकलठाणा बाजाराच्या नाल्याजवळ नेऊन जाळून टाकला होता.
गस्तीवरील पोलिसांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर याप्रकरणी सुरुवातीला एमआयडीसी सिडको पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली होती. तपासात सदर विवाहितेची ओळख पटली व तिची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी एकुण सतरा जणांचे जवाब घेण्यात आले. पेट्रोल पंपावरील कर्मचारी व नोडल अधिकारी यांची साक्ष प्रभावी ठरली. घटनेच्या वेळी आरोपीचे मोबाईल लोकेशन आणि सीडीआर तपासणीत त्यानेच हत्या केल्याचे निष्पन्न झाले.