अकोला – रेल्वे स्टेशनवर गाडीतून खाली उतरल्यावर पोलिसासोबत झालेल्या वादातून करण्यात आलेली शिवीगाळ, मारहाण आणी अंगावर फेकलेला सामान या प्रकरणी खटल्याचा निकाल जाहीर झाला. अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालपत्रात महिलेला दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
31 मे 2010 रोजी चौघे पोलिस कर्मचारी अकोला रेल्वे स्थानकावर ड्युटीवर कार्यरत होते. त्यावेळी अमरावती मुंबई एक्स्प्रेस ही गाडी प्लॅटफॉर्मवर आली. त्यावेळी महिलांच्या डब्यातून काही महिला खाली उतरल्या. जया राजेश शुक्ला ही महिला अंगावर सामान पडल्याच्या रागातून पतीसोबत त्या महिलांवर राग व्यक्त करत भांडत होती. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी जया शुक्ला या महिलेस समजावण्यासह तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जया शुक्ला हिने पोलिसांना शिवीगाळ व तिचा पती राजेश शुक्ला यने मारहाण केली.
राजेश शुक्ला व जया शुक्ला या दोघा पती पत्नीविरुद्ध रेल्वे पोलिस स्टेशनला भा.द.वि. 353, 332, 323, 504 या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल जुमळे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. जिल्हा व सत्र न्यायमुर्ती डी.बी.पतंगे यांच्य न्यायालयात हा खटला सुरु होता. न्यायालयाने एकुण बारा साक्षीदार तपासले.
जया राजेश शुक्ला या महिलेस न्यायालयाने दोषी ठरवले असून कलम 353 नुसार दोन वर्ष शिक्षा तसेच एक हजार रुपये दंड, भा.द.वि. 332 नुसार एक वर्षाची शिक्षा व पाचशे रुपयए दंड तसेच कलम 323 अन्वये सहा महिने शिक्षा व पाचशे रुपये दंड, कलम 504 नुसार सहा महिने शिक्षा व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्याचे कामकाज सुरु असतांना जया शुक्ला यांचा पती राजेश शुक्ला यांचे निधन झाले होते. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील अॅड. राजेश आकोटकर यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.




