नाशिक : जळगावचे माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीनंतर जळगाव शहरातील अनधिकृत होर्डींग्ज महापालिकेकडून काढण्यात आले आहेत. तशाच स्वरुपाच्या कारवाईचे नियोजन गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात देखील सुरु आहे. नाशिक शहरात आता होर्डींग्ज लावण्यासाठी पोलिस परवानगी आवश्यक करण्यात आली आहे. नाशिक शहर पोलिसांकडून तसे नियोजन युद्धपातळीवर सुरु असून कारवाईची अधिसूचना लवकरच काढली जाणार असल्याचे संकेत पोलिस आयुक्त दिपक पांडेय यांनी दिले आहेत.
नेत्यांचे वाढदिवस आले म्हणजे शहरातील चौकाचौकात मोठमोठ्या होर्डींग्जचे दर्शन घडते. ज्यांना कधी पाहिले नाही त्यांचे गॉगल लावलेले, हातात कडे घातलेले चेहरे शुभेच्छा फलकांवर बघण्यास मिळतात. पुर्वी दिसणा-या सिनेमाच्या पोस्टर्सची जागा आता जणू काही नेत्यांच्या वाढदिवसांच्या पोस्टर्सनी घेतल्याचे चित्र दिसून येते.
नाशिक शहर पोलिसांकडून घेण्यात आलेल्या पोस्टर्सला आता क्रमांक मिळणार आहे. विनापरवानगी फलक लावलेल्या व फलकावर चेहरे दाखवणा-या सर्वांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. विनापरवानगी फलकबाजी करणा-यांवर नाशिक पोलिसांची वक्रदृष्टी पडली असून त्यातून जणू काही भाऊ, दादा, आधारस्तंभ, प्रेरणास्थान यांना एक इशारा मिळाला आहे. फलकावर छापण्यात येणा-या मजकुराची खात्री केल्यानंतरच त्यांना पोलिसांकडून क्रमांक मिळणार आहे.