लोहा (नांदेड) (भाऊसाहेब सोनकांबळे) – लोहा शहरातील जुना लोहा येथे श्री शिवशक्ती गणेश मंडळांच्या वतीने आयोजित कोविड १९ लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन अनेक नागरिकांनी या लसीकरण शिबिरात सहभाग नोंदवून लसीकरण करून घेतले.
गेल्या दोन वर्षांपासून चीन मधून आलेल्या कोरोना या संसर्गजन्य रोगाने आपल्या लोहा शहरासहित संपुर्ण देशभरात व जगात हाहाकार माजविला यात निष्पाप नागरिकांना जीव गमावावा लागला. कोरोनाला हरविण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने महत्वाची कामगिरी केली. कोरोनाच्या दोन लाटा आपल्या राज्यात व देशात येऊन गेलेल्या आहेत आता भविष्यात जर तिसरी लाट आली तर तिच्या पासुन बचाव होण्यासाठी शासनाच्या वतीने कोरोना (कोविड 19) प्रतिबंधक व्हाॅकसीन लसीकरण सर्वत्र चालू आहे.
या लसीकरणाचा प्रचार प्रसार सगळीकडे होत आहे पण अनेक नागरिकांनी अद्याप पर्यंत लसीकरण केले नाही. तेव्हा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटणकर , संतोष तांबे पोलीस निरीक्षक लोहा व नगर परिषदेचे लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लोहयातील श्री शिवशक्ती गणेश मंडळांच्या वतीने दि. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन लोहा तहसिलदार राम बोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लोहा न.पा.चे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बारी, मान्यवर आदी उपस्थित होते. या लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन यात अनेक नागरिकांनी लसीकरण करून घेतले. सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री शिवशक्ती गणेश मंडळांचे अध्यक्ष , उपाध्यक्ष सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.