जिमचालकाच्या खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप, चौघे निर्दोष

बीड – जिमची थकबाकी असलेली फी मागण्याच्या वादातून जिमचालकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना पाच वर्षापुर्वी बीड शहरात घडली होती. या घटनेप्रकरणी बीड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. जिल्हा व सत्र न्यायालयाने बीड येथील तिघांना दोषी ठरवले असून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. इतर चौघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

बिड येथील बालेपीर परिसरात डी.के. हेल्थ क्लब या नावाने शहबाज खान दलमीर खान (28), जुना बाजार, कमवाडा, बीड यांचा जीम चालवण्याचा व्यवसाय होता. या जिममध्ये कालू ऊर्फ अरबाज खान राजू खान, अफरोज राजू खान, सुमेर खान, समद खान, जुबेर खान हे ग्राहक म्हणून येत होते. त्यांच्याकडे दोन महिन्यांची जिमची फी बाकी होती. त्यामुळे जिमचालक शहबाज खान व आरोपी यांच्यात वाद झाला होता.

17 मे 2017 रोजी या वादाचे पर्यावसन हत्येत झाले होते. या दिवशी सायंकाळी कालूसह त्याच्या साथीदारांनी शहबाज खान यांच्यावर जिवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात कालू व साथीदारांनी मिळून शहबाज खान यांच्यावर चाकूचे वार केले. इतरांनी लाथाबुक्क्यांनी देखील मारहाण केली होती. या घटनेत शहबाज खान यांचा मृत्यू झाला होता.

मयत शहबाजचे चुलते दस्तगीर खान हमीद खान यांच्या फिर्यादीनुसार कालू ऊर्फ अरबाज खान राजू खान, समद खान युसूफ खान, राजू ऊर्फ फेरोज खान युसूफ खान, जुबेर खान समद खान, सुमेर खान समद खान, अफरोज राजू खान व वाजेद खान समद खान ( सर्व रा. बुंदेलपुरा बीड) अशा सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स.पो.नि. एस. एस. जाधव यांनी तपासाअंती न्यायालयात चार्ज शिट दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) सी. एम. बागल यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली.

जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. अजय राख यांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद केला. अ‍ॅड. आर. बी. देशपांडे व पैरवी अधिकारी म्हणून हे.कॉ. उबाळे यांनी त्यांना सहकार्य केले. या खून खटल्यात दोन साक्षीदार सरकार पक्षाच्या वतीने तपासण्यात आले. घटनास्थळासह चाकूवरील रक्त, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष या आधारे न्या. सी. एम. बागल यांनी कालू ऊर्फ अरबाज राजू ऊर्फ फेरोज खान, समद खान युसूफ खान आणि राजू ऊर्फ फेरोज खान युसूफ खान (रा. बुंदेलपुरा, बीड) अशा तिघांना जन्मठेपेची सजा सुनावली. इतर चौघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here