औरंगाबाद – अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत असतांना तयार केलेला व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या बसचालकाला तिन वर्षाची सक्तमजुरी तसेच विविध कलमानुसार 1 लाख 2 हजार 200 रुपये द्रव्यदंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के.आर. चौधरी यांनी सुनावली आहे. अविनाश कैलास शेजूळ (19, रा. फुलेनगर, पंढरपूर) असे बस चालक आरोपीचे नाव आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिकेने याप्रकरणी फिर्याद नोंदवली होती. 17 जानेवारी 2020 रोजी शाळेतील मुख्याध्यापीकेच्या व्हाट्सअॅपवर एक व्हिडिओ आला होता. तो व्हिडीओ निरखून पाहिला असता त्यांना त्यात त्यांच्याच शाळेचा बसचालक अविनाश शेजूळ हा त्याच्या दोन साथीदारांसह असल्याचे आढळले. तो एका आठ वर्ष वयाच्या मुलीचा विनयभंग करत तिला मारहाण करताना दिसून आला.
मुख्याध्यापिकेने हा प्रकार पीडित मुलीच्या आई-वडील व शाळेच्या पदाधिकाऱ्यांना कथन केला. 18 जानेवारी 2020 रोजी आरोपी अविनाश शेजूळ याला या प्रकरणी जाब विचारला असता त्याने 16 जानेवारी रोजी दुपारी हा प्रकार केल्याचे कबुल केले. त्यावेळी शाळेतील मुलांना त्याने धमकी देखील दिली होती. सातारा पोलिस स्टेशनला या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास व पुढे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी फिर्यादीसह पीडित मुलगी व तपास अधिकारी तथा तत्कालीन पो.नि. विठ्ठल पोटे यांची साक्ष नोंदवण्यात आली.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद व साक्षी पुरावे आदींच्या आधारे न्यायालयाने आरोपी अविनाश शेजूळ याला दोषी ठरवत भादंवि 354, पोक्सो कलम 8 व 12 नुसार प्रत्येकी तिन वर्ष सक्तमजुरी तसेच पाचशे रुपये दंड, बालकांचे न्याय हक्क संरक्षण कायद्यानुसार तिन वर्ष सक्तमजुरी तसेच एक लाख 2 हजार दोनशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. अॅड. शिरसाठ यांना अॅड. तेजस्विनी जाधव तसेच पैरवी अधिकारी रज्जाक शेख यांनी मदत केली.