अमरावती – अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील खोलापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या एका गावात नात्यातील महिलेवर तरुणाने बलात्कार केल्याप्रकरणी 14 नोव्हेंबर 2019 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी 34 वर्ष वयाच्या आरोपीस आजीवन कारावास तसेच विस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सह सत्र न्यायमुर्ती डी. डब्ल्यू. मोडक यांनी हा निर्णय दिला आहे.
14 नोव्हेंबर 2019 रोजी पीडिता घरी एकटी असतांना आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग करत या प्रकाराची वाच्यता न करण्याची धमकी दिली होती. तसेच तिचा मोबाईल देखील हिसकावून घेतला होता. खोलापूर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणी आठ साक्षीदार तपासण्यात आले आणि त्यातील कुणीही फितूर झाले नाही. आरोपीने दंड न भरल्यास त्याला सहा महिन्यांचा अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. विशेष सरकारी वकील सोनाली सुबोध क्षीरसागर यांनी केलेला युक्तिवाद प्रभावी ठरला. खोलापूरचे तत्कालीन पोलिस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी तपास पुर्ण केला.