रुग्ण महिलेचा विनयभंग – डॉक्टरला कारावास

अमरावती – वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या महिला रुग्णाचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टरला एक वर्षासाठी कारावास व पन्नास हजार रुपये दंडाची सजा सुनावण्यात आली आहे. अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाचे (क्रमांक २) न्यायाधीश व्ही. एस. गायके यांनी हा निर्णय दिला आहे.

डॉ. स्वप्निल विनायक घाटोळ असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉ. स्वप्निल घाटोळ यांच्या रुग्णालयात सदर तक्रारदार महिला वैद्यकीय उपचारार्थ गेली होती. उपचाराच्या वेळी डॉ. स्वप्निल घाटोळ यांनी विनयभंग करत जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार सदर महिलेने गाडगेनगर पोलिस स्टेशनला दाखल केली होती.

याप्रकरणी गाडगेनगर पोलिस स्टेशनला 20 मे 2015 रोजी विनयभंग व ॲट्रॉसिटी कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त एल.एन. तडवी यांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सदर गुन्हा सिद्ध झाल्याने डॉ. स्वप्निल घाटोळ (रा. आशियाड कॉलनी, अमरावती) यांना एक वर्ष कैद व पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. मिलिंद जोशी यांनी युक्तिवाद केला तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून संतोष चव्हाण व विनायक रामटेके, मुरलीधर डोईजड यांनी न्यायालयीन कामकाजात मात केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here