शरद पवारांनंतर आता उद्धव ठाकरे यांची मुलाखत; सामनाचे संपादक, खासदार संजय राऊत यांचे ट्विट

मुंबई – शिवसेनेचे मुखपत्र “दै.सामना” चे संपादक व खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे प्रणेते व राष्ट्रवादी पक्षाचे सुप्रिमो खासदार शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. “एक शरद, सगळे गारद” या मथळ्याखाली राऊत यांनी व्हिडिओ मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत महाविकास आघाडी, राज्य सरकार, कोरोना या मुद्द्यांवर पवारांनी भाष्य केले. आता, संजय राऊत यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत राउत यांनी सामना साठी घेतली आहे. सर्वच प्रश्नांची दिलखुलास उत्तरे त्यांना मिळाली. मुलाखतीत ऊध्दव ठाकरे कोरोनापासून ते राम मंदिरापर्यंत सर्व विषयावर दणक्यात बोलले, असे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ही मुलाखत देखील शरद पवार यांच्या मुलाखतीप्रमाणेच विविध टप्प्यात प्रसिद्ध होणार आहे. या महिन्यातील 25 आणि 26 जुलै रोजी ही मुलाखत आपल्याला वाचता व पाहता येणार असल्याचे राऊत यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे.

राम मंदिर भूमिपूजनावरुन रा.कॉ.चे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. राम मंदिर बांधल्याने कोरोना नाहीसा होईल असे काहींना वाटतं असे ते म्हणाले. त्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. या देशातील लाखो डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी या सर्वांनी परिश्रम घेतले आहे. कोरोनाची लढाई तेच लढतील व ती देखील देवाच्या आशीवार्दाने, असे राऊत म्हणाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे मुलाखतीमध्ये नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’च्या धर्तीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्हिडिओद्वारे शुक्रवारी ‘दिल की बात’ केली. यात त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यानंतर आता दिल की बात या टॅगलाईनद्वारे शिवसेना पक्षप्रमुखांची मुलाखत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here