आर्यन ड्रग्ज प्रकरणात नेमके काय खरे – काय खोटे?

सिने अभिनेता शाहरुख खान पुत्र आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात धाडी घालणारी केंद्रीय संस्था एनसीबी आणि कथित आरोपी यांच्यात परस्परांवर आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला आहे. मुंबई लगतच्या समुद्रात क्रुझवर एनसीबीच्या छाप्यात आर्यन खानसह सुमारे बारा – तेरा जणांना पकडण्यात आले. ज्यांनी हा छापा घातला ते अधिकारी समीर वानखेडे हिरो आणि खानपुत्र आर्यन व्हिलन असे प्रारंभीचे चित्र दिसले. परंतु या छाप्याच्या काही छायाचित्रात भाजपाचे कुणी गोसावी आणि मनिष भानुशली हे दोन भाजपा कार्यकर्ते दिसून आले. त्यामुळे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आवाज उठवला. नवाब मलिक यांच्या जावयाला देखील एनसीबीने अशाच एका प्रकरणात “उचलले” होते. परंतु त्यांच्याजवळील सुगंधी तंबाखू हिच ड्रग्ज समजून हा खोटा गुन्हा नोंदवल्याचा आक्षेप मलिकांनी घेतला. त्यानंतर समीर वानखेडे – बॉलीवूड –  राष्ट्रवादी कॉंग्रेस – भाजपात जुंपली.

बॉलिवूडचे बहुसंख्य अभिनेते आर्यन शाहरुख खान समर्थनार्थ पुढे आले. तर आपल्या जावयाच्या बाबतीत जी सुडाची वागणूक एनसीबीने केली ते बघता आर्यन खानला खोट्या गुन्ह्यात फसवले जात असल्याचा युक्तीवाद नवाब मलिक यांनी केला. एवढेच नव्हे तर ज्या क्रुझवर छापा मारला तेथे नेमके कुणाकडे किती ड्रग्ज मिळाले त्याचे “ऑन द स्पॉट” पंचनामे कुठे आहेत? भाजपा कार्यकर्त्यांच्या  साथीने आरोपींना पकडून एनसीबी कार्यालयात ही छाप्याची स्टोरी रचली गेली असा दावा मलिक यांनी केला. त्यानंतर मलिक – वानखेडे यांच्यात जुंपली. समीर वानखेडे यांनी आपल्या मागावर दोन पोलिस पाळतीवर असल्याचा आरोप केला.

एनसीबीचे वानखेडे यांच्यासारखा बड्या अधिका-याचे म्हणणे क्षणभर खरे मानले तर पोलिस खात्याचीच माणसे शॅडोत दिसली तरी त्यांचा आक्षेप आहे काय? त्यांच्यामागे कुणी गुंड तर नव्हते ना? अशी मोठी कामगिरी करणा-या वानखेडे यांच्यासारख्या अधिका-यांच्या केसालाही धक्का लागू नये यावर जनतेचे एकमत आहे. आम्हालाही तसेच वाटते. परंतु हेच प्रकरण पुढे ताणून नेतांना समीर वानखेडे यांना “हिरो” ठरवण्याचा जोरदार आटापिटा दिसून आला.

एनसीबी देखील हिरो असल्याचे ढोल बडवण्यात आले. एवढेच नव्हे तर नवाब मलिक हे मुस्लिम समाजाचे नेते असल्याने ते खान कंपनीसह बॉलीवूडच्या बचावात पुढे असल्याचा दावा करण्यात आला. एनसीबीला बदनाम करण्याचे प्रयत्न आहेत असे कुणी म्हणाले. थोडक्यात या प्रकरणाला “हिंदु – मुस्लिम” असा रंग चढवण्याचा प्रयत्न छुपा प्रयत्न सुरु झाल्याचे बोलले जात आहे. अमली पदार्थ विक्रेत्यांना – पेडलर्सना – व्यसन करणारांना पकडणे हे एनसीबीचे कामच असल्याचे सिने अभिनेता रजा मुराद यांनी म्हटले.

मध्यंतरी या धाडीत पकडलेला आर्यन खान याचे म्हणे वानखेडे यांनी समुपदेशन केले. त्यामुळे हा कथित तरुण आरोपी भावी जीवनात अत्यंत चांगले आदर्शवादी काम करणार अशी ग्वाही देऊ लागल्याचा जोरदार डांगोरा पिटण्यात आला. एखाद्या गंभीर गुन्ह्यतील आरोपीचे उगाच उदात्तीकरण करण्याचा हा प्रकार का केला जातोय? असा प्रश्नही विचारला जातोय. सोशल मिडीया आर्यन समर्थक – विरोधक असा विभागला आहे. कुणी म्हणते त्याला फसवले जातेय. तर गुजरातच्या एका बंदरावर मध्यंतरी हजारो किलो ड्रग्जची खेप (सुमारे तिस हजार कोटी) पकडली गेल्यावर या विषयाला बगल देण्यासाठी “आर्यन खान” ड्रग्ज तस्करी (दहा ते पन्नास ग्रॅम) स्टोरी पसरवण्यात आल्याचेही बोलले जाते.

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी हे प्रकरण लावून धरल्याने रोज नवे खुलासे बाहेर येत आहेत. गेल्यावर्षी कोविड काळात हेच समीर वानखेडे आणि त्यांची लेडी डॉन म्हणवली जाणारी भगीनी यास्मीन दुबई – मालदीवच्या आलीशान हॉटेलात गेले होते. ते हप्ता किंवा खंडणी वसुली करत असल्याचे सुचीत करणारा आरोप मलिक यांनी केला. एनसीबी कारवाईचा धाक दाखवून बॉलीवूडमधून “पैसा वसुली” करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. राजकीय क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवाब मलिक, रा.कॉ. नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याची बदनामी करण्यासाठी ही असली प्रकरणे गाजवली जात असल्याचा आरोप केला. उत्तर प्रदेशात आगामी काळात निवडणूका असल्याने जनतेच्या लक्षात यावे अशा पद्धतीने हिरो – व्हिलनचा हा खेळ मांडल्याचा मविआ कडून सुचक आरोप होत आहे.

“क्राईम सिन” कडे लक्ष न देता आर्यन खानला पकडून देण्याची हिरोगिरी करणारा, पंच असलेला गोसावी गायब झालाय. या गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर याने माध्यमांकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात हे प्रकरण मिटवण्यासाठी शाहरुख खान याच्याकडे 25 कोटी रुपये मागण्यात आले. त्यापैकी 18 कोटीत “डील” पक्की ठरली आणि त्यातून आठ कोटी वानखेडे यांना देणार होते असे आपण ऐकले असा जवाब दिल्याने खळबळ माजली आहे. आपणास एका ठिकाणी जाऊन 50 लाख रुपये आणण्यास सांगितल्याचे देखील तो म्हणतो. या नव्या स्टोरीमुळे एनसीबी बॅक फुटवर आणि वानखेडे संशयाच्या भोव-यात अशी नवी थिअरी पुढे आली आहे.

क्रुझवर सापडलेली 39 वर्षाची मॉडेल मुनमुन धमेचा हिचा वकील कासीफ खान याने आपले अशील मुनमुन हिचा चरस प्रकरणी संबंध नाही ती दिल्लीत असते. तिच्यासाठी कुण्या बलरामने ऑफर दिली. तिकीटही नसतांना ती आलि. तेथे सोनीया होती. तेथे जमीनीवर चरस पडले होते. प्रत्येक जण हात वर करत आहे. त्यामुळे कोण खरे व कोण खोटे? हा संभ्रम दिसतो. काही तरी लबाडी आहे हे हमखास. 18 कोटीची तोडपाणी असेल तर एनसीबी वर कसा विश्वास ठेवावा? दाल मे कुछ काला है जरुर!  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here