नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये काही गुंडांनी एका पत्रकारावर गोळ्या झाडून हत्या केली. विक्रम जोशी असे या पत्रकाराचे नाव असून तो मुलीसोबत घरी जात होता. त्यावेळी वाटेत गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विक्रम जोशी यांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विक्रम जोशी यांच्या मृत्यूनंतर थेट युपी सरकारवर निशाणा साधला आहे. “वचन होतं राम राज्याचं, दिले गुंडाराज” असं म्हणत राहुल यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “आपल्या भाचीसोबत होणा-या छेडछेडीला विरोध केला म्हणून पत्रकार विक्रम जोशी यांची हत्या करण्यात आली. आपल्या सहवेदना शोकाकूल परिवारासोबत आहेत. वचन राम राज्याचे दिले होते, दिले गुंडाराज” असं ट्विट त्यांनी केले आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवर राहुल गांधी यांनी योगी सरकारवर कडाडून टीका केली आहे. गाझियाबादच्या विजयनगर भागातून विक्रम जोशी आपल्या दुचाकीवरून मुलीसोबत जात होते. त्यावेळी काही गुंडांनी मागून येत त्यांना घेरले. तसेच जोशी यांना बेदम मारहाण करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांनतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.
हा सर्व प्रकार पत्रकार जोशी यांच्या मुलीने पाहिला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जोशी यांनी आपल्या भाचीसोबत झालेल्या छेडछाडीची पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यामुळेच हा हल्ला झाला असल्याचा संशय जोशी कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.