गोंदिया (अनमोल पटले): गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीकोटा येथील पत संस्थेत ठेवीदारांची ठेवीचा गैर व्यवहार झाला आहे. या प्रकरणी तिरोडा पोलिसात गुन्हा दाखल आहे. सदर प्रकरण सन 2017 पासून सुरु आहे. संचालक मंडळानी खातेदारांचे 45 कोटी रुपये बुडवले असून खातेदार वारंवार आपल्या पैशाची मागणी करत आहेत. मात्र ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे दिले जात नाही. तिरोडा विधानसभा मतदार संघाचे आमदार विजय रहांगडाले यांचे बंधू राजेंद्र रहांगडाले संचालक मंडळात असूनही ठेविदारांना पैसे देण्यात आले नाही.
सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदारांनी पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता तीन वर्ष उलटूननही खातेदारांचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे आज खातेदारांनी आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. आमदारांच्या भावाला अटक होण्यासह खातेदारांचे पैसे देण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदाराच्या जनसंपर्क कार्यालयासमोर पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आंदोलकांना भेटण्यासाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर आलेच नाही. याप्रसंगी रविकांत ( गुड्डु ) बोपचे, जागृती भ्रष्टाचार संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेशकुमार तायवाडे, उपाध्यक्ष अशोक पेलागडे, सचिव रितेशकुमार गहेरवार, गायकवाड सर, तिवुडे सर, वैद्य अंडेवाला, बंसोड व मोठ्या संख्येने ठेवीदार व खातेधारक हजर होते.