पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्यास सक्तमजुरी

बीड : पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोषी आरोपीस सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत महाजन यांनी सदर निकाल दिला आहे. विष्णू श्रीरंग भापकर (रा. लखमापुरी पो. सुखापुरी ता. अंबड जि. जालना) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

10 मे 2016 रोजी गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील त्वरीता देवीचा यात्रा महोत्सव होता. सदर यात्रेत मांसाहारी भोजनाचा नवस फेडण्याची परंपरा असते. यात्रेदरम्यान बंदोबस्तकामी पोलिसांसाठी तंबूची व्यवस्था केली होती. यात्रेत विष्णू भापकर हा आपल्या परिवारासह आलेला होता. दोन महिलांसह मांसाहारी जेवण घेऊन तो पोलिसांच्या तंबूत जाण्याच्या प्रयत्नात होता. पोलिस नाईक रेवणनाथ गंगावणे यांनी त्याच्या या कृत्यास विरोध केला. बंदोबस्तकामी देण्यात आलेल्या तंबूत जेवण करता येणार नसल्याचे त्याला सांगण्यात आले होते.

यावेळी संतप्त विष्णू भापकर व त्याच्या सोबत असलेल्या दोघा महिलांनी पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. घटनेच्या वेळी मोठया प्रमाणात गर्दी जमलेली गर्दी पांगावण्यात आली होती. तलवाडा पोलिस स्टेशनला विष्णू भापकर व त्याच्यासोबत असलेल्या दोघा महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीएसआय आर.आर. गडवे यांनी या गुन्ह्याचे चार्जशीट न्यायालयात दाखल केले.

साक्षी पुरावे आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद या आधारे विष्णू भापकर यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत महाजन यांनी दोषी ठरवले. त्यास दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अनिल तिडके यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here