गोंदिया (अनमोल पटले) : तिरोडा तालुक्यातील जागृती सहकारी पत संस्थेच्या फेर लेखापरीक्षणात सन 2015 ते 19 या कालावधीत 3 कोटी 30 लाख 71 हजार रुपयांची अफरातफर व 15 कोटी 32 लाख 44 हजार 91 रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आजी-माजी संचालकांसह शाखा व्यवस्थापक आदींविरुद्ध 30 डिसेंबर 2020 रोजी तिरोडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.
जागृती भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या वतीने ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने संबंधित विभागांना वारंवार निवेदन व पत्र देण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप कारवाई झाली नसल्याचे जागृती भ्रष्टाचार संघर्ष समितीचे म्हणणे आहे.
आगामी 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे जागृती भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती स्मिता सुमित बेलपत्रे यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी जागृती भ्रष्टाचार संघर्ष समितिचे अध्यक्ष राजेशकुमार तायवाडे (पत्रकार), उपाध्याय अशोक पेलागडे, सचिव रामप्रसाद तिबुडे, रितेशकुमार गहेरवार, भास्कर गायकवाड, प्रतिभा गायकवाड, अजय वैद्य, आरिफ़ पठाण, रजनी पेलागडे, व दिलीप देशमुख उपस्थित होते.