रेशन दुकानदारांना क्लीन चिट देणा-यांची चौकशी व्हावी – दीपककुमार गुप्ता

जळगाव : जळगाव शहर व परिसरातील कथित रेशन घोटाळ्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या वतीने त्यांच्या समर्थनार्थ बचावात्मक दाखले देणाऱ्या सर्वांची जिल्हाधिका-यांनी रितसर चौकशी करण्याची मागणी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहे.

या पत्रात त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहे. चौकशीत महापौर, उप महापौर आणि नगरसेवक यांना रेशन धान्य दुकानदारांची बाजू सांभाळत दाखला देण्याचा अधिकार आहे काय? या दाखल्यांच्या मागे त्यांचा काही स्वार्थ लपला आहे काय? महापौर, उप महापौर आणि नगरसेवकांच्या हितचिंतक अथवा नातेवाईकांची ती दुकाने आहेत काय? रेशन धान्य दुकान क्रमांक 38/06 बाबत त्यांनी पत्रात लक्ष वेधले आहे.

काही दिवसांपूर्वी गुप्ता यांनी महापौर जयश्री महाजन यांच्यासोबत मोबाईलवर वार्तालाप केला होता. त्यात नोव्हेंबर 2021 या महिन्या संदर्भात रेशन दुकानदारांच्या विरोधात तक्रारी आल्याचे महापौरांनी कबुल केले आहे. मात्र असे असतांना देखील आपण दिलेला दाखला माहे डिसेंबरच्या चांगल्या कामाचा असल्याचे त्यांनी गुप्ता यांना म्हटले आहे. माहे नोव्हेंबरच्या तक्रारींचा खल सुरु असतांना डिसेंबरच्या चांगल्या कामाचा दाखला महापौर, उप महापौर आणि नगरसेवकांनी दिला असल्यामुळे या दाखल्यांना गृहीत धरु नये असे दीपककुमार गुप्ता यांचे म्हणणे आहे.

नगरसेवक भगत बालाणी यांच्या लेटर हेड वर त्यांच्या सहीचा दाखला सादर करण्यात आला आहे. तो दाखला, ती सही आणि तो मजकूर आपला नसल्याचे बालाणी यांचे गुप्तां यांना सांगणे आहे. त्यामुळे हा एक नवा वाद सुरु झाला आहे. एकंदरीत महापौर, उप महापौर आणि नगरसेवकांनी रेशन दुकानदारांच्या बचावासाठी दिलेले दाखले संशयास्पद ठरत असून वादात सापडले आहेत.

या सर्व दाखल्यांची चौकशी होण्याचे आदेश द्यावे अशी विनंती दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे. प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या सर्वांविरुद्ध भा.द.वि. 420, 200, 201 व इतर प्रचलित कायद्यानुसार कारवाईची मागणी गुप्ता यांनी केली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here