कला वैचारिक समृद्धीला प्रगल्भ करते- ‘लाॕकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शन चर्चासत्रात मान्यवरांचा सूर


जळगाव : आनंद,समाधान आणि नवनिर्मितीतून सृजनशील समाज उभारण्यासाठी कला महत्त्वाची आहे. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये कलेच्या माध्यमातून प्रतिबिंब असते,यातूनच वैचारिक समृद्धी घडते.

‘भाऊंना भावांजली’ परिवर्तन महोत्सवातील लाॕकडाऊन डायरी चित्रप्रदर्शनातील ‘कला आणि माणूस’ या संदर्भात चर्चासत्र संपन्न झाले. याप्रसंगी देशदूतचे संपादक हेमंत अलोने, चित्रकार राजू बाविस्कर, विजय जैन, हरुन पटेल, ज्ञानेश्वर शेंडे, कलाशिक्षक नितीन सोनवणे यांनी सहभाग घेतला. कला आणि संस्कृती यांची माणसाच्या जडणघडणीत असलेले महत्त्व याविषयी चर्चा करताना हरुन पटेल यांनी जगण्याचे सौंदर्य निर्माण करते ती कला असे स्पष्ट केले.

कलावंत हा नेहमी नवे भावविश्व निर्माण करीत असतो, यातूनही बौद्धिक समृद्धी घडते. माणसाच्या इतिहासाचा आढावा घेतला असता तर मूळ स्वरूपातील जी चित्रकला होती ती गुहेत होती, ती बहरत गेली आणि त्यातूनच कलावंत घडत गेला, माणुसकीचा संस्कारही वाढत गेला. संस्कृती संस्कारीत करण्यासाठी कला खूप महत्त्वाची आहे ती मानवाला समृद्ध करते आणि बौद्धिक विकासही करते असे हरून पटेल यांनी म्हटले. चित्रकार राजू बाविस्कर यांनी भाऊंच्या उद्यानातील वानखेडे कलादालनामध्ये ‘लाॕकडाउन डायरी’ या चित्र प्रदर्शनाविषयी माहिती दिली.

कोणत्याही शहराची सांस्कृतिक ओळख ही महत्त्वाची असते. त्यादृष्टीने जळगाव शहराची सांस्कृतिक ओळख हे भवरलालजी जैन व अशोकभाऊ जैन यांच्या प्रोत्साहनामुळे होत असल्याचे गौरवोद्गार राजू बाविस्कर यांनी काढणे. ‘लाॕकडाउन डायरी’ या प्रदर्शनाची थीम सांगताना विजय जैन यांनी सामान्य माणसांचा आशावाद असणारी ही कोरोना काळातील चित्रे असल्याचे सांगितले. कला आणि माणूस हे नातं जोडताना हेमंत अलोने यांनी शहराची प्रगती हे कलावंतांवरही अवलंबून असते. यातून माणूस व कलेचे नातं जोडता येऊ शकते. शहर सांस्कृतिक समृद्ध करण्यासाठी कलाकारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, आनंद, समाधान आणि नवनिर्मिती करायचे असेल तर प्रत्येक जण कलाकाराच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिले पाहिजे आणि हे काम जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन आणि आता अशोक जैन हे नेहमी करीत असल्याचे हेमंत अलोने म्हणाले. चित्र सूचणे आणि ते साकारणे हा प्रवास म्हणजे मनाचे प्रतिबिंब होय,असे कलाशिक्षक नितीन सोनवणे यांनी सांगत चित्र साक्षरता विषयावर भाष्य केले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी कला आणि संस्कृती या चर्चासत्राचे सुत्रसंचालन केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here