बोगस एनसीबी अधिका-यांनी घातली भीती —अभिनेत्रीने थांबवली आपल्या जीवनाची गती

काल्पनिक छायाचित्र

एनसीबीची कारवाई आपल्यावर होणार असे समजताच अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो हे अनेक खंडणीबहाद्दरांच्या लक्षात आले आहे. त्यातूनच नकली खंडणीखोर एनसीबी अधिका-यांच्या टोळ्या तयार झाल्याचे दिसून येत आहे.

अशाच भीतीपोटी जोगेश्वरी येथे एका भोजपुरी अभिनेत्रीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. सलमा उर्फ  संजना उर्फ झारा खातून असे या अभिनेत्रीचे नाव आहे. या प्रकरणी अंबोली पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा तोतया एनसीबी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

तिघा मित्रांसोबत अभिनेत्री सलमा उर्फ संजना कलिना येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेली होती. त्याठिकाणी नकली एनसीबी अधिकाऱ्यांच्या रुपात आलेल्या आरोपींनी अटकेची भीती दाखवत भोजपुरी अभिनेत्री सलमा हिस चाळीस लाख रुपयांची मागणी केली होती. घासाघीस केल्यानंतर अखेर विस लाख रुपये देत कारवाई थांबण्याचे ठरले. आरीफ गाझी हा या कटाचा सूत्रधार होता.

त्यानंतर बदनामीच्या तणावाखाली आलेल्या अभिनेत्रीने जोगेश्वरीत आपल्या राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपुष्टात आणले. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी सूरज मोहन परदेशी, आशीर काझी, नोफेल रोहे व सूरजचा साथीदार प्रवीण वालिंबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत ठाणे जिल्ह्यातील सुरज व प्रवीण या दोघांना अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here