जळगाव रेल्वे स्टेशन पोलीस मदत केंद्राची साफसफाई

जळगाव : जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील पोलीस मदत केंद्र गेल्या काही वर्षापासून धूळखात पडले होते. या मदत केंद्रात कुणीही पोलीस कर्मचारी गेल्या काही वर्षापासून बसलेला नाही. बंद अवस्थेतील या पोलीस मदत केंद्रात व बाहेर धुळीसह घाणीचे साम्राज्य पसरले होते.

सदर पोलीस मदत केंद्र सुरु करण्याची मागणी गेल्या वर्षी 22 नोव्हेंबर 2021 रोजी सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी लेखी पत्राद्वारे पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्या पत्राच्या मागणीनुसार जळगाव रेल्वे पोलीस मदत केंद्राची साफसफाई आज करण्यात आली असून या ठिकाणी पोलिसांच्या उपस्थितीची प्रतीक्षा आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अजय भूषण पांडे यांच्या कार्यकाळात त्यांच्या हस्ते व तत्कालीन पोलिस अधीक्षक दीपक जोग यांच्या अध्यक्षतेखाली या पोलिस मदत केंद्राचे उद्घाटन झाले होते. पोलिस अधीक्षक दीपक जोग यांनी सुरु केलेले व सध्या बंद असलेले मदत केंद्र दीपककुमार गुप्ता यांनी सुरु करण्याची मागणी केली आहे.

यापूर्वी देखील अनेक वेळा सदर पोलीस मदत केंद्र सुरु झाले व बंद देखील झाले आहे. पोलीस मदत केंद्र सुरु करण्याची मागणी पत्रकाच्या माध्यमातून केली जाते. मागणीच्या आधारे सुरुवातीचे काही दिवस सदर पोलीस मदत केंद्र सुरु होते व काही दिवसांनी पुन्हा बंद होत असल्तेयाचा आजवरचा अनुभव आहे. सदर पोलीस मदत केंद्र कायमस्वरूपी सुरु रहावे अशी प्रवासी वर्गाची मागणी आहे. या परिसरात रिक्षा चालकांच्या मनमानीसह खाद्य पदार्थ विक्रेत्यांची दुकाने रात्री दहा वाजेनंतर देखील सुरु असतात. या पोलीस मदत केंद्रापासून दोन पावलांवर शासकीय कार्यालय आहे. या शासकीय कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातच खाद्य पदार्थ विक्रेते दुकान मांडून बसतात. त्यामुळे शासकीय कामकाजासाठी आलेल्या गरजूंना आत जाण्यास अडचण निर्माण होत असते. याठिकाणी शासकीय कार्यालय आहे किंवा नाही हे देखील या अतिक्रमणामुळे लक्षात येत नाही. प्रवाशांच्या खिशातील पाकीटमारीसह मोबाईल चोरीच्या घटना या परिसरात नित्याच्या झाल्या आहेत. शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे पोलीस मदत केंद्र कायम स्वरुपी सुरु रहावे अशी प्रवासी वर्गाची रास्त अपेक्षा आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here