शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचा-यांचे “तंगडे” कोण तोडणार?

आमचा गांधीजींचा देश आहे. त्यात लोकशाही. “कुणी गालात एक मारली तर दुसरा गाल पुढे करा” हि आम्हाला शिकवण मिळाली आहे. पण तिसरी हाणली तर काय करायचे हे गांधीजींनी सांगितले नाही. म्हणजे आम्ही त्याच्या हड्डया फासळ्या तोडणार हे सिने अभिनेता संजय दत्ताने एका चित्रपटात दिलेले उत्तर आहे. याच धर्तीवर शिक्षण क्षेत्रातल्या भ्रष्टाचा-यांचे तंगडे कोण तोडणार? असा प्रश्न जनतेच्या ओठातून बाहेर पडू लागला आहे. सरत्या वर्षात पेपर फोडण्याचे प्रकरण गाजले. कुणा “सुपे” च्या घरातून म्हणे कोट्यावधी रुपयांचे घबाड पकडले गेले. केवळ हाच नव्हे तर त्या आधीच्या वर्षी देखील पेपर फोडला गेला होता. आणखी काही पकडले. एमपीएससी परीक्षेतही तेच घडले. ती परीक्षा पास होवून नोकरीची ऑर्डर नाही म्हणून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. म्हणजे या शिक्षण क्षेत्रातल्या शिक्षणाचा बाजार आणि परीक्षांचा देखावा केवळ भ्रष्टाचा-यांनी 700 पिढ्यांची सोय करण्यासाठीच मांडलाय काय? असा जनतेला प्रश्न पडू लागला आहे.

जनता बिचारी मुकाट कुणीही हांका अशा अवस्थेत लुटली जातेय. शिक्षण क्षेत्रातील हा धिंगाणा आवरावा असे कुणालाही वाटत नाही. राज्यात पुन्हा “कोरोना – ओमायक्राँन” ची चर्चा. संकटे आहेत ती येतील व जातील. प्रशासन व्यवस्थेत जनतेला लुटणा-यांचे काय? राज्याचे प्रशासन प्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झालेली. विरोधक भाजपावाले त्यांच्या आजाराची नको तेवढी चर्चा पसरवून सरकारची कोंडी करण्यात गुंतलेले. ज्या सुपेकडे करोडोचे घबाड मिळाले त्याला बढत्या भाजपच्या राज्यात मिळाल्या ना! एखादा सुपे एवढा पराक्रम करतो तेव्हा सरकार नावाची यंत्रणा झोपा काढत होती काय? राज्याच्या प्रशासन यंत्रणेत बहुधा प्रत्येक मंत्री आपल्या खात्यात “टक्केवारी” चा खेळ मांडून बसलेला असतो. मधुर भांडारकर या सिने निर्मात्याने त्याच्या एका चित्रपटात मोठ्या कामांची टेंडर्स मंत्री फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये टक्केवारीसह काँल गर्ल पुरवणा-या ठेकेदारांना कशी मंजूर करतात ते दाखवले होते. अर्थात तो चित्रपट असला तरी जनतेत जे चालत तेच तेथून उचलले जाते. दुसरा निर्माता प्रकाश झा. त्याने “अपहरण” चित्रपटातून काही राजकीय नेतेच पैसा कमावण्यासाठी गुंडांच्या भागीदारीत जनतेच्या “अपहरणाचा” खेळ मांडून कसे करोडो रुपये उकळतात यावर आवाज उठवला. अनेक क्षेत्रात जनतेला अशा गुंडांकडून आणि व्यवस्थेतल्या यंत्रणेला हप्ते द्यावे लागतात हे वास्तव आहे.

पोलीस खात्यातील हप्तेखोरी, शेकडो कोटींची हप्ता वसुली गाजली. करोडो रुपये खेचण्याच्या स्पर्धेत “पोलीस आयुक्त विरुद्ध मंत्री असा रंगलेला सामना पहात आहोतच. मंत्र्याला बदनाम करून पोलीस जनतेचा आदर्श ठरु शकत नाही. ज्यांच्या अंगावर खाकी वर्दी तेच कायद्याचा दंडुका चालवून करोडो रुपये कसे वसूल करतात हे “मटका चालक कल्याणजी आणि रतन खत्री यांनी दाखवून दिले आहे. सन 1980 च्या दशकात पाचशे कोटीची ब्लँक मनी खेचण्याचा हा खेळ लाखो लोकांच्या खिशातून पैसे खेळला गेला.

आता काळ बदलला. अवैध धंद्यापेक्षा दुकानाचा 22 फुटी लांबलचक बोर्ड लावून लाखो रुपये लुटण्याचा नवाच धंदा म्हणजे शिक्षण खात्याचा कारभार. येथे शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, मंत्र्यांचे पी.ए., नातेवाईक, शिक्षण संस्थांच्या संघटना, विद्यापीठे, शिक्षण संस्थांनी निर्माण केलेली दुकानदारी या शाळा, महाविद्यालये, नर्सरी, बालवाड्यांची बाजारपेठ. शिक्षण पसा-यात परीक्षांची व्यवस्था व परीक्षांचे पेपर फोडण्याची बदमाशी. एका शिक्षकाची नोकरी 20 ते 30 लाख रुपये उपटून देणारे संस्थाचालक गाजलेत. मेडिकल कॉलेजची सुमारे एका विद्यार्थ्यामागे 3 कोटी रुपये उकळून अँडमिशन देणारी मंडळी. ही बदमाशी उघड होवून देखील सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेणारे संस्था चालक पाच कोटी रुपयांचा दंड भरुन संस्था वाचवणारे महाभाग. शिवाय भ्रष्टाचारी मार्गाने मेडिकल कॉलेजेसचा परवाना मिळवणारी मंडळी असा हा बाजार आहे. त्यातल्या त्यात आता तीन वर्षाच्या मुलांना नर्सरीत प्रवेश देतांना 80 हजार ते 1 लाख रुपयांचा रेट सांगणारे संस्था चालक जनतेला लुटण्यात सज्ज दिसतात आणि ज्यांनी या बदमाशांना ठोकायचे ते कोरोनाच्या नावाखाली ते लपून राहू इच्छितात. त्यामुळे आता या बदमाशांना कोण ठोकणार? असा जनतेच्या मनात प्रश्न येणे साहजिक आहे.

शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रकरणात शिक्षणाधिकारी लाखो रुपये उकळतात. हवी तेथे पोस्टींग मिळवण्यासाठी देणारे देतातही. जळगाव जिल्ह्यात तीन शिक्षकांच्या बदलीसाठी शिक्षणाधिका-याने घेतलेले साडे चार लाख रुपये एका आमदाराने काढून राजकारण खेळले. ते प्रकरण अद्याप दडपले आहे. मंत्री बच्चू कडू म्हणतात जर भ्रष्टाचार आढळला तर कारवाई करु. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे करोडो रुपयांची पेपरफुटी असो, शिक्षण मंत्र्यांचा भ्रष्टाचार असो . त्यांना या प्रकाराशी काही देणे घेणे नाही. भ्रष्टाचा-यांना वाचवणा-या “जर” “तर” मधेच भ्रष्टाचाराची गोम लपलेली आहे. प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात येतच नाही. हस्तक – दलाल काम करतात. भांडे फुटलेच तर जाती – पातीच्या आमदार मंत्र्यांकडे धावतात. त्यांच्या अंगणात पाय ठेवण्याची लाखोंची अदृश्य पावती फाडतात म्हणे. पण पुढे ते प्रकरण थंड बस्त्यात जाते. यात जनतेने काय ते समजावे. आठवा तो प्रामाणिक लाकुडतोड्या. पोट भरण्यासाठी भली मोठी कु-हाड घेऊन जंगलात गेलेला. आता ते जंगल संपले. लाकुडतोड्या संपला. शिक्षण क्षेत्रात कु-हाडी विनाच लोकांना लुटण्याचा धंदा मांडून बसलेल्यांच काय करायचे. त्यामुळे त्या लाकुडतोड्याची मागे राहिलेली कु-हाड आपणच हाती घेऊन “यांच तंगड तोडावे” असे जनतेला वाटू लागल्यास दोष कुणाचा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here