जळगावच्या पत्रकाराने उठवला “मालकशाही” विरुद्ध आवाज : ताटाखालची मांजरे शिकणार काय?

आज 6 जानेवारी 2022, पत्रकार दिन. पत्रकारिता क्षेत्रातील आदर्शाची गोड बासुंदी घोटण्याचा दिवस. राज्यभर अनेक ठिकाणच्या समारंभात पाहुणे मंडळी समस्त पत्रकारांना आदर्शाचे डोस पाजणार! इतरांवरील अन्याय – अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करणारी पत्रकार मंडळी मात्र वृत्तपत्र क्षेत्रातील मालकशाहीची पिळवणूक निमुटपणे सहन करत बसली आहे. शेवटी नोकरी व भाकरीचा प्रश्न. ती टिकवण्यासाठी काही मंडळी वृत्तपत्र क्षेत्रातील अशा बंडखोरीची भाषा करणारांची म्हणजे आपल्याच सहका-यांची “टीप” मँनेजमेंटला देवून जास्तीचा “केक” मिळवू पाहतात. अशा प्रवृत्ती विरुद्ध आपल्या क्षेत्रातील “बेरक्या”ने स्वत:ला दिग्गज म्हणवणा-या अनेकांना लाथा घातल्या आहेत. या तडाख्यातून खूनाची भीती घालत पुण्यातून दिल्लीत पिटाळलेला भाऊ, “दिव्य” दृष्टीचा साक्षात्कार झालेला “संजय”, त्याचे फेकमफेक स्पेशालीस्ट कथित गुरु “अखंडकुमार” यांना चांगलेच उकलून काढल्याचे सोशल मिडीयावर वाचनात आले.(बेरक्याची गाथा अस्मादिकांसह अनेकांच्या संग्रही आहे बर का) त्याबद्दल बाणेदारपणा दाखवणा-या बेराक्याचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच होय.

अशाच प्रकारच्या बाणेदारपणा जळगावच्या आणखी एका पत्रकाराने दाखवला आहे. तो जिथे काम करत होता तेथील मालकाने त्याचा पगार थकवला. पगार मागताच संपादक तणतणला आणि फणफणला. पत्रकाराला घरचा रस्ता दाखवला. बघता बघता दोन वर्ष उलटत आली. पगार मिळत नाही म्हटल्यावर कुणी संप करतात. कुणी आंदोलने करतात. मग आम्हीच काय घोडे मारले. पत्रकाराची सटकली.

चार दिवसांपूर्वी एका लग्नसमारंभात त्याने सरळ “भाऊ”च्या खांद्यावरच हात ठेवला. “भाऊ विसरलात काय? माझा पगार कधी देणार ते बोला”. भाऊला मोठाच राग आला. चार चौघात आपला रुबाब मिरवण्यासाठी कुठला पगार, कुठले पैसे, जा देत नाही काय करायचे ते करुन घे हे नेहमीचे गुर्मीतील आणि ठराविक साच्यातील उत्तर ठरलेले होते. तेच उत्तर यावेळी पुन्हा मिळाले. दोघांचा आवाज चढला. अनेकांनी हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहिला. अनेकांचे श्रमाचे पैसे न दिल्याने तळतळा घेण्यासह बदनामीचा शिक्का कपाळी बसलेल्या या मालक संपादकाबाबत उपस्थित प्रेक्षक काय समजायचे ते समजले. पत्रकारांनो, “शिकणार का काही धडा, की भांडवलदार – मालकाच्या शिदोरीवर “झूम बराबर झूम” डोलत ताव मारणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here