पत्रकार – पत्रकारिता आणि बाजारबुणगे

बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकार सृष्टीचा पाया घातल्याने त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन म्हणून आज 6 जानेवारी रोजी “पत्रकार दिन” साजरा केला जातो. पत्रकार आणि पत्रकारिता क्षेत्राचा हा गौरव दिन म्हटला जातो. आजच्या पत्रकार दिन समारंभात मान्यवर पाहुणे मंडळी (विज्ञान – साहित्यिक – राजकीय नेते – उच्च पदस्थ पुढारी – भांडवलदार – दानशूर वगैरे) पाचारण करुन कार्यभाग साधला जातो. पाहुणे मंडळी पत्रकारांनी काय करावे, काय छापावे, याबद्दल “डोंगरे बालामृत” समान उपदेशाचे डोस पाजतात. “पत्रकारीतेचे बदलते स्वरुप – आव्हाने”, “पत्रकारिता आज – काल – उद्या” अशा स्वरुपाचे विचारमंथन होते. अलीकडे काही पोटार्थी (बाळासाहेबांच्या भाषेत “पोटावळे”) “पेन्शन द्या हो” म्हणून भोकांड पसरताहेत. “तुम्ही पत्रकारिता क्षेत्रात आलात ते सरकारवर उपकार करण्यासाठी – पेन्शन मागण्यासाठी नव्हे” हे यांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. पत्रकारांच्या तथाकथित संघटनावाल्या टोळ्यांचा राज्यभर धुमाकूळ दिसून येतो.

वृत्तपत्र श्रृष्टी हा एक व्यापार व्यवसाय केव्हाच बनला आहे. त्यामुळे आता या क्षेत्राची यशस्वी दुकानदारी करणारेच टिकतील हे उघड आहे. वृत्तपत्रे आणि पत्रकारिता पवित्र व्रत वगैरे सब झूट आहे. ज्या वृत्तपत्राचे “शो रुम” आणि व्यवसाय दणकट नफ्याचा त्याचाच बोलबाला राहणार आहे असे एक माजी मंत्री म्हणाले होते. शिवाय अन्य क्षेत्रातल्या ख-या खोट्या धंद्यातून निर्माण केलेल्या भांडवलाला लोकशाही व्यवस्थेतून संरक्षण म्हणूनही बरीच मंडळी या क्षेत्रात आली आहे. भांडवलशाही साखळी वृत्तपत्राच्या चालक मालकांनी संपादकांचे वैचारिक स्वातंत्र कधीच संपवले असून त्यांना “बिझनेस टार्गेट्स” च्या बदल्यात ती खुर्ची बहाल केली आहे. आपल्या व्यवसाय साखळीसह हितसंबंधी मित्रांचे हितरक्षण आणि जनसंपर्क अधिकारी अशा भूमिकेत संपादक आणून ठेवल्याचे बोलले जाते.

आता सोशल मिडियाच्या आगमनाने घातलेला धुमाकूळ ही नवी आव्हाने मानली जात आहेत. शिवाय इतर अनेक अवैध धंदे करणा-या काळ्या  पैशावाल्यांचे कोट्यावधींचे मनी लाँड्रींग करणारी बाजारबुणगेछाप मंडळी वृत्तपत्रांच्या प्रिंट लाईन मध्ये घुसण्यात यशस्वी झाली असल्याचे म्हटले जात आहे. “मराठी मराठी”च्या नावे कोल्हेकुई करत चँनल चालवणा-या एका फ्राँड  धंदेवाल्याकडे पत्रकार म्हणून “सुकाणू” सांभाळणारी मंडळी त्याचे रक्षक कसे आणले हे महाराष्ट्राने पाहिले. संबंधित भ्रष्टाचारी जेलवारी करत बसलेला दिसतो.

वृतपत्रे आणि ती निर्माण करण्याची विधायक उर्जा यापेक्षा सत्याचा आवाज दाबून टाकणारी कर्कश लाऊड स्पीकरवाली कोल्हेकुई याचे ठेकेदार वाढू लागले आहेत. सत्य काय हे सांगण्यापेक्षा “खोटे हेच सत्य” असे हजारवेळा ओरडून सांगण्याचा “कोरस” लाऊडस्पीकर सत्याचा गळा घोटू लागला आहे. याही काळात काही मंडळी सत्य – तत्वनिष्ठा यासाठी धडपातांना दिसताहेत. त्यांची ताकद कमी दिसते. तरी त्यांच्या प्रयत्नांना सलाम. उरलेल्या बाजारबुणग्यांबद्दल काय बोलावे?   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here