प्रसिद्ध हेअर स्टायलीस्ट जावेद हबीब यांच्या एका वादग्रस्त व्हिडीओमुळे उत्तर प्रदेशांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता मध्य प्रदेशात या व्हिडीओमुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 48 तासात जावेद हबीब संचालित सर्व सलून इंदोर शहरात बंद झाले नाही तर आंदोलनाचा इशारा भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांनी दिला आहे.
जावेद हबीब यांनी एका महिलेला मंचावर आमंत्रित करत केशरचनेदरम्यान तिच्या डोक्यावर थुंकण्याचा प्रकार या व्हिडीओत दाखवण्यात आला आहे. युपी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आता इंदूरचे भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांनी इंदूरमध्ये जावेद हबीब संचालित सर्व सलून ४८ तासांच्या आत बंद करण्याचा इशारा दिला आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी प्रशासनातील सर्व अधिका-यांना इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी मनीष सिंह, मनपा आयुक्त प्रतिभा पाल, पोलीस आयुक्त हरी नारायणचारी मिश्रा अशा सर्व अधिका-यांना त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून निवेदन दिले आहे. जावेद हबीब यांच्या या कृत्याचा आपण विरोध करत असून त्यांच्या संस्था इंदोर शहरात चालू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.